‘लेडी नटवरलाल’ने ओळखीतील चौघांना घातला २६ लाखांनी गंडा; वेगवेगळे आमिष दाखवून ओढले जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 12:49 PM2022-06-03T12:49:01+5:302022-06-03T12:55:08+5:30

गिट्टीखदान येथील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या एका महिलेने तिच्या ओळखीतील चारजणांकडून २६ लाखांहून अधिक पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

‘Lady thief’ steals Rs 26 lakh from four acquaintances at nagpur | ‘लेडी नटवरलाल’ने ओळखीतील चौघांना घातला २६ लाखांनी गंडा; वेगवेगळे आमिष दाखवून ओढले जाळ्यात

‘लेडी नटवरलाल’ने ओळखीतील चौघांना घातला २६ लाखांनी गंडा; वेगवेगळे आमिष दाखवून ओढले जाळ्यात

googlenewsNext

नागपूर : गिट्टीखदान येथील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या एका महिलेने तिच्या ओळखीतील चारजणांकडून २६ लाखांहून अधिक पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. तिने प्रत्येकाला वेगवेगळे आमिष दाखवीत जास्त परतावा देण्याचा दावा केला होता. पल्लवी कमलेश जावळेकर (३०) असे या महिलेचे नाव असून, तिने अशा प्रकारे शहरातील आणखी काही लोकांनाही फसविले असल्याची शक्यता आहे.

पेन्शननगर येथील धानोरकर कॉम्प्लेक्स येथील निवासी सुषमा अनिल धानोरकर (४५) यांच्याशी पल्लवीने ओळख केली व त्यांना कमी किमतीत किराणा सामान उपलब्ध करून देत त्यांचा विश्वास संपादित केला. सुषमा यांचादेखील तिच्यावर विश्वास बसला.

पल्लवीने त्यांच्यासमोर आर्थिक अडचण असल्याची कैफियत मांडली. त्यानंतर २७ डिसेंबर २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान तिने सुषमा यांच्याकडून दागिने घेतले. हे दागिने मी गहाण ठेवीन व माझे पैसे आले की दुप्पट रक्कम देईन, असे आमिष दाखविले. सुषमा यांनी तिला १७ तोळे दागिने व रोख एक लाख असा एकूण साडेनऊ लाख रुपये दिले. पल्लवीने सुषमा यांची बहीण प्रियंका गुप्ता यांनादेखील जाळ्यात ओढले व कमी किमतीत स्विफ्ट कार घेऊन देण्याचे आमिष दाखवत पाच लाख रुपये घेतले. त्याचप्रमाणे सुषमा यांच्या ओळखीच्या मालती प्रमोद बडे यांना पाच तोळे सोने देण्याचे आमिष दाखवीत त्यांच्याकडून २ लाख रुपये घेतले. तिने आणखी एक परिचित सय्यद मेहफुज अली यांना तर आठवड्याभरात तेलाची ३०० पिंपे व ४ लाख रुपयांचे सोने कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवीत त्यांच्याकडून १० लाख रुपये घेतले.

अन् ती झाली मिस्टर इंडिया..

चौघांकडूनही तिने २६ लाख ५० हजार रुपये घेतले व त्यानंतर पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुषमा यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तिने आणखी कुणाला अशा पद्धतीने ‘टार्गेट’ केले आहे का, याचा शोध सुरू आहे.

पाचपावलीतही गुन्हा

कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून पल्लवी कमलेश जवळेकर हिने एका महिलेस २.४५ लाखांना गंडविल्याची घटना पाचपावली ठाण्यांतर्गतही उघडकीस आली आहे. माया अशोक इंगळे (वय ५२, सिद्धार्थनगर, टेका) यांना पल्लवीने कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखविले. तिने ३५ हजार प्रति तोळा सोने देण्याची बतावणी करून ७ तोळे सोन्यासाठी २ लाख ४५ हजार रुपये घेतले. परंतु, सोने न दिल्यामुळे माळा इंगळे यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Web Title: ‘Lady thief’ steals Rs 26 lakh from four acquaintances at nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.