लाहोरी बारचा परवाना रद्द
By admin | Published: December 28, 2016 03:24 AM2016-12-28T03:24:28+5:302016-12-28T03:24:28+5:30
गुन्हेगारांशी वाद घालत हाणामारी तसेच गोळीबार करणाऱ्या बार संचालकाने नियमभंग केल्याचा ठपका ठेवत
नागपूर : गुन्हेगारांशी वाद घालत हाणामारी तसेच गोळीबार करणाऱ्या बार संचालकाने नियमभंग केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी मंगळवारी धरमपेठेतील बहुचर्चित लाहोरी डिलक्स बार अॅन्ड रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसात दोन बार मालकांना दणका दिल्याने शहरात मनमानीपद्धतीने बार-रेस्टॉरंट चालविणाऱ्या मद्यालयाच्या संचालकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी कुर्वे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, अनुज्ञप्तीधारकाने मुंबई विदेशी मद्य नियम १९५३ मधील नियम ४९ नुसार शासनाने प्रदान केलेली अनुज्ञप्ती स्वत: अथवा नोकरनामाधारकास व्यक्तीच्या वतीने योग्य पद्धतीने चालविणे आवश्यक आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीला बार चालविण्यास दिला जाऊ शकत नाही.
मात्र, अनुज्ञप्ती(क्रमांक ४४)धारक समीर शर्मा हा बार आणि रेस्टॉरंट चालविताना मुंबई दारूबंदी कायदा १९५३ चे कलम ४९ चे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले. तसा अहवालही पोलीस आणि अबकारी खात्याकडून मिळाला. एवढेच नव्हे तर तेथे १३ नोव्हेंबरच्या रात्री गुंडांच्या एका टोळक्यासोबत बारमधील कर्मचाऱ्यांचा जोरदार वाद झाला. त्यानंतर कुख्यात शेखू टोळीने तेथे येऊन धुडगूस घातला. वाहनांची तोडफोड केली. दगडफेक करून गोळीबार केला. बार संचालक समीर शर्मानेही गोळीबार केला. कुणालाही गोळी लागली नाही त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, गोळीबाराच्या घटनेने तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी दोन्हीकडून तक्रारी नोंदविण्यात आल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी कुख्यात शेखू, पप्पू डागोर तसेच त्याचे साथीदार आणि लाहोरीचा संचालक समीर शर्मा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. काहींना अटकही केली.
पोलिसांनी त्यांचा चौकशी अहवालात परवानाधारकाने गंभीर नियमभंग केल्याचा निष्कर्ष नोंदवला.
लाहोरीच्या आत-बाहेर नेहमीच हाणामारीच्या घटना घडतात. अनेकदा तेथे तोडफोडही झाली आहे, असेही पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. त्यावरून लाहोरी डिलक्स बारची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कुर्वे यांनी आज जारी केलेल्या आदेशातून स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)
अनेक ठिकाणी हप्ताखोरी
शासनाने बार आणि रेस्टॉरंटच्या संचालकांना वेळ ठरवून दिली आहे. मात्र, शहरातील अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बार संचालक अटी-शर्तींचे उल्लंघन करून पहाटेपर्यंत बार चालवितात. पोलिसांच्या हप्ताखोरी वृत्तीमुळेच हे होते. दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी क्लाऊड सेव्हन बार अॅन्ड रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला तर, त्याच्या २४ तासानंतर जिल्हाधिकारी कुर्वे यांनी लाहोरीला दणका दिला. त्यामुळे पहाटेपर्यंत सेवा देणाऱ्या बार संचालकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.