महिला डॉक्टरचे सव्वाचार लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:08 AM2021-03-27T04:08:29+5:302021-03-27T04:08:29+5:30
१२ महिन्यात रक्कम दुप्पट : आमिष दाखवून फसवणूक नागपूर : १२ महिन्यात रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ठगबाज सुदत्ता ...
१२ महिन्यात रक्कम दुप्पट : आमिष दाखवून फसवणूक
नागपूर : १२ महिन्यात रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ठगबाज सुदत्ता प्रमोद रामटेके आणि लोकेश जनार्दन वाघमारे यांनी डॉ. सपना पंकज पाटील यांचे चार लाख २१ हजार रुपये लंपास केले. धंतोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
डॉ. सपना पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रामटेके आणि वाघमारे या दोघांनी त्यांना एशिया ऑनलाईन कंपनीमध्ये रक्कम दुप्पट करण्याच्या वेगवेगळ्या स्कीम असल्याचे सांगितले. १० ते १२ महिन्यात गुंतवणुकीची रक्कम दुप्पट होते, असे प्रलोभन दाखवले. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्याकडून ४ सप्टेंबर २०२० रोजी चार लाख २१ हजार रुपये घेतले. त्यानंतर मात्र आरोपींनी त्यांना कसलाही परतावा दिला नाही. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे डॉ. पाटील यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली आरोपी रामटेके आणि वाघमारे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---