लाखानींना २५ लाखांचा गंडा : नागपुरातील कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:03 PM2019-02-28T22:03:55+5:302019-02-28T22:06:30+5:30
जळगावच्या एका शेंगदाणा व्यापाऱ्याला नागपुरातील दोन दलालांनी २५ लाखांचा गंडा घातला. रक्कम बुडविणाऱ्या दलालांनी आपली दुकाने बंद करून नागपुरातून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जळगावच्या एका शेंगदाणा व्यापाऱ्याला नागपुरातील दोन दलालांनी २५ लाखांचा गंडा घातला. रक्कम बुडविणाऱ्या दलालांनी आपली दुकाने बंद करून नागपुरातून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
खुशाल भगवानदास लाखानी (वय २४, रा. आदर्शनगर, जळगाव) हे आशीर्वाद अॅग्रो इंडस्ट्रीजच्या नावाने राजकोट (गुजरात) येथून शेंगदाण्याचा व्यवसाय करतात. लाखानी दलालांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मागणीनुसार माल पाठवितात.
१५ नोव्हेंबर २०१८ ला कळमन्यातील कृष्णा ट्रेडिंग कंपनी, कन्हैयालाल लालवानी (रा. इतवारी मस्कसाथ) याने लाखानी यांच्याशी संपर्क करून त्यांनी श्री कॉर्पोरेशनच्या मालकाचा नंबर दिला. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा, तुम्हाला मोठी ऑर्डर मिळेल, असे आरोपीने सांगितले. त्यानुसार लाखानी यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क केला असता, त्याने बालाजी कन्व्हर्सर(दलाल, इतवारी बाजार)चा संपर्क क्रमांक देऊन त्याच्याशी बोलायला सांगितले. त्यानुसार लाखानींनी बालाजी कन्व्हर्सरच्या संचालकासोबत संपर्क केला असता त्याने १६ टन शेंगदाण्याची ऑर्डर दिली. माल पोहचल्यानंतर चार दिवसांनी पेमेंट मिळेल, असेही सांगितले. त्यानुसार लाखानींनी ३ जानेवारी २०१९ ला जलाराम ट्रान्सपोर्ट राजकोट येथून कृष्णा ट्रेडिंगमध्ये १२ लाख ६० हजारांचा शेंगदाणे पाठविले. ७ जानेवारीला शेंगदाणे नागपुरात पोहचले. त्यानंतर बालाजी कन्व्हर्सरच्या संचालकाने संक्रांतीपूर्वी २५ टन शेंगदाणे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार लाखानींनी पुन्हा १७ लाख ७९ हजार ७५० रुपयांचा माल बालाजी कन्व्हर्सरला पाठविला. १२ जानेवारीला तो येथे पोहचला. ठरल्याप्रमाणे एकूण ४१ टन शेंगदाण्याचे ३० लाख ३९ हजार ७५० रुपये लाखानींना घ्यायचे होते. मात्र, त्यातील केवळ ५ लाख रुपये लाखानींना देऊन कृष्णा ट्रेडर्स तसेच बालाजी कन्व्हर्सरच्या संचालकांनी २५ लाख ३९ हजार ७५० रुपयांची रक्कम हडपली. एवढेच नव्हे तर लाखानी ज्या मोबाईलवर संपर्क करीत होते, ते फोन आणि आपली दुकाने बंद करून आरोपी पळून गेले. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने लाखानी यांनी बुधवारी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींची चौकशी केली जात आहे.
अनेकांना गंडा
या दलालांनी ज्या पद्धतीने आपली दुकाने बंद करून येथून पळ काढला. त्यावरून त्यांनी लाखानींसारखाच अन्य व्यापाऱ्यांनाही गंडा घातला असावा, असा संशय आहे. पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत.