लकडगंज झोनच्या शाळांमध्ये दुरावस्था
By Admin | Published: September 5, 2015 03:16 AM2015-09-05T03:16:23+5:302015-09-05T03:16:23+5:30
महापालिकेच्या शाळेतील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या शाळांमध्ये ...
शिक्षण सभापतींनी मांडले वास्तव : महापौरांना सोपविला अहवाल
नागपूर : महापालिकेच्या शाळेतील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात अव्यवस्था आढळून आली आहे. शिक्षण सभापती गोपाळ बोहरे यांनी महापालिकेच्या २० शाळांची पाहणी केली. यात हे वास्तव उघड झाले आहे. लकडगंज झोन अंतर्गत शाळांमध्ये सर्वाधिक विद्यार्थीसंख्या आहे. मात्र, या शाळांमध्ये सुविधांचा अभाव व शिक्षकांची मनमानी असल्याचे आढळून आले आहे.
बोहरे यांनी शाळांच्या पाहणीचा विस्तृत अहवाल महापौर प्रवीण दटके व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सोपविला असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही उपाय सुचवित शिफारशीही केल्या आहेत. समितीने धरमपेठ झोनमधील सात, गांधीबाग झोनमधील पाच व लकडगंज झोनमधील आठ शाळांची गेल्या २५ दिवसात पाहणी केली. लकडगंजमधील संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या तीन शाखा- मुख्य शाखा, मिनीमाता नगर व वांजरा शाखा येथे सर्वाधिक तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. याच शाळेतून या वर्षी दहावीचा टॉपर आला. असे असतानाही समितीला पाहणीदरम्यान या शाळेविषयी बऱ्याच तक्रारी मिळाल्या. शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच नाहीत. नियमित वर्ग होत नाहीत. लोकमतने या संबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. शिक्षण सभापतींच्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
सभापती बोहरे यांनी सांगितले की, संजयनगर माध्यमिक शाळेत नववी व दहावीचे वर्ग नियमित होत नाहीत, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली. याशिवाय वर्गात येणारे शिक्षक शिकवत नाही. मुख्याध्यापकाकडे तक्रार केली तर त्याची सुनावणी होत नाही. शौचालयाची स्थिती वाईट आहे, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या शाळेकडे विशेष लक्ष देण्याची शिफारस समितीने आपल्या अहवालात केली आहे. समितीमध्ये नगरसेविका रश्मी फडणवीस, वर्षा ठाकरे, दिव्या धुरडे, शिक्षणाधिकारी अशोक टालाटुले, सीमा खोब्रागडे यांचा समावेश होता.