लखोबा लोखंडेची साथीदार सविता जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:04 AM2018-08-31T01:04:39+5:302018-08-31T01:05:28+5:30
अनेक महिलांचे जीवन उद्ध्वस्त करणारा आकाश माणिकलाल अग्रवाल (वय ४०) नामक लखोबा लोखंडेच्या पापात साथ देणारी आरोपी सविता कुंभारे ऊर्फ अग्रवाल हिला गोंदियावरून अटक करून बेलतरोडी पोलिसांनी गुरुवारी नागपुरात आणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक महिलांचे जीवन उद्ध्वस्त करणारा आकाश माणिकलाल अग्रवाल (वय ४०) नामक लखोबा लोखंडेच्या पापात साथ देणारी आरोपी सविता कुंभारे ऊर्फ अग्रवाल हिला गोंदियावरून अटक करून बेलतरोडी पोलिसांनी गुरुवारी नागपुरात आणले.
घटस्फोटित आणि विधवा तसेच एकाकी श्रीमंत महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करायचे आणि संधी मिळताच त्यांची चल अचल संपत्ती विकून आर्थिक लुबाडणूक करायची, असा आरोपी अग्रवालचा धंदा होता.
आरोपी अग्रवाल विविध नावाने वेगवेगळ्या ठिकाणी वावरतो. सध्या तो बेसा मनीषनगरातील स्वस्तिक अपार्टमेंटमध्ये राहत होता. सेकंड शादी डॉट कामच्या माध्यमातून तो एकाकी, विधवा, घटस्फोटित आणि निराधार श्रीमंत महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. आपला पेट्रोलपंप आहे, मोठे रेस्टॉरंट आणि फार मोठा व्यवसाय आहे, अशी थाप मारून आपण एकटेच आहोत. आपल्याला कुणीतरी जिव्हाळ्याचा साथीदार हवा आहे, अशी बतावणी करून तो संबंधित महिलेला आकर्षित करीत होता. नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. नंतर तिच्या नावे असलेली चलअचल संपत्ती विकून तिला वाऱ्यावर सोडायचा. त्याने महाराष्टÑ तसेच मध्य प्रदेशातील अनेक महिलांशी अशा प्रकारे दगाबाजी करून त्यांच्या जीवनाचा खेळखंडोबा केला आहे. २३ आॅगस्टला दुपारी ३.३० ला त्याने अशाच प्र्रकारे बेसा-बेलतरोडीत वर्धेतील एका महिलेला भेटीला बोलवले. तिला घर आणि व्यवसाय दाखवण्याच्या बहाण्याने आपल्या डस्टर कारमध्ये बसवले. त्यानंतर कारमध्येच तो तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. मात्र, त्याच्या विकृतीची शिकार बनलेल्या एका महिलेने त्याचा पाठलाग करून त्याला बेस्यात रंगेहात पकडले. वर्धेतील महिलेच्याही ते लक्षात आणून दिले आणि या दोघींनी त्याला बेलतरोडी पोलीस ठाण्यात नेले. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्या पापात सविता कुंभारे ऊर्फ अग्रवाल ही महिलादेखिल सहभागी असल्याचे लक्षात आले. ती त्याची बहीण बनून पीडित महिलांना फसवण्यासाठी अग्रवालची साथ देत होती. त्यावरून तिचाही शोध सुरू केला. ती पळून गेली होती. आज ती गोंदियात आल्याचे कळताच तिला अटक करून नागपुरात आणण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर तिची चौकशी सुरू होती.