कुख्यात सुपारी तस्कर गणी-फारुखच्या गोदामात छापा, लाखोंची सुपारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 03:04 PM2021-12-31T15:04:59+5:302021-12-31T15:07:52+5:30
गुरुवारी रात्री पोलिसांनी कळमण्यातील जे. बी. गृह उद्योग नामक गोदामावर छापा घातला. पवनगाव मार्गावर असलेल्या या गोदामाजवळ सुपारीने भरलेला ट्रक सापडला. या ट्रकमध्ये तसेच गोदामात पोलिसांना एकूण १८० पोती सुपारी आढळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपारी तस्कर गणी आणि फारुखच्या कळमण्यातील गोदामात छापा मारून पोलिसांनी लाखोंची सुपारी जप्त केली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या पथकाने गुरुवारी रात्री केलेल्या या कारवाईमुळे सुपारी तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
कळमना, लकडगंज, तहसील, जरीपटका आणि शांतीनगरमध्ये सडक्या सुपारीचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून जोरात सुरू आहे. लाखोंची सडकी सुपारी नागपुरात आणून तिच्यावर भट्टीत रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यानंतर शुभ्र तसेच टणक बनविलेली, आरोग्यास घातक असलेली ही सुपारी कोट्यवधी रुपयात विकली जाते. अनेक सुपारी तस्कर या गोरखधंद्यात सहभागी आहेत. या तस्करांचे पोलीस दलात खबरे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सडक्या सुपारीचा धंदा करणाऱ्या तस्करांवर नजर रोखली आहे.
या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या विशेष पथकाने कळमण्यातील जे. बी. गृह उद्योग नामक गोदामावर छापा घातला. पवनगाव मार्गावर असलेल्या या गोदामाजवळ सुपारीने भरलेला ट्रक सापडला. या ट्रकमध्ये तसेच गोदामात पोलिसांना एकूण १८० पोती सुपारी आढळली. हे गोदाम फारुख नावाच्या इसमाचे आहे. गणी नामक तस्कर हे आणि आजूबाजूच्या तस्करांचे गोदाम संचालित करतो.
कारवाई दरम्यान पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकालाही येथे बोलवून घेतले. यावेळी, गणी आणि त्याच्या दलालांनी कारवाई थांबवण्यासाठी मोठी धावपळ केली. दलालांनी काही पोलिसांशी संपर्कही साधला. मात्र पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांची या कारवाईवर नजर असल्याची जाणीव असल्यामुळे तस्करांच्या संपर्कातील काही पोलिसांनी दलालांना झिडकारले. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या सुपारीचे नमुने एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी ताब्यात घेतले. त्याचा अहवाल आल्यानंतर आणि फारुख तसेच गणीकडील कागदपत्र तपासल्यानंतर पुढची कारवाई ठरविण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त कलवानिया यांनी लोकमतला सांगितले.