लाखोंची विकासकामे मात्र स्वच्छतेकडे कानाडोळा; नागपूर स्थानकावर रेल्वे प्रशासनाची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:14 AM2018-02-11T11:14:43+5:302018-02-11T11:14:58+5:30
मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही.
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर उद्यान तयार करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यानिमित्त रेल्वेस्थानक चकाचक करण्यात आले. बाहेरुन शोभेची झाडे, कुंड्या आणण्यात आल्या. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही.यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना उघड्यावर लघुशंकेला जावे लागत असून रेल्वे प्रशासनाने अस्वच्छतेचे अभियान सुरु केले की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागात एक आरक्षित तिकिटांचे तर दोन अनारक्षित तिकिटांचे कार्यालय आहे. येथे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सोईसुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. आरक्षण कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. पिण्याचे पाणी तर सोडा परंतु साध्या प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांची पंचाईत होत आहे. व्यवस्थाच नसल्यामुळे रेल्वेस्थानकावर येणारे नागरिक लघुशंकेसाठी रेल्वेस्थानक परिसरात पार्किंग, नव्याने तयार करण्यात आलेले गार्डन, आरपीएफ शेजारील अपंगांचे पार्किंग याचा वापर करताना दिसतात.
यामुळे परिसरात दुर्गंधी पसरणे सुरू झाले आहे. रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील भागात लाखो रुपये खर्चून विकासकामे केली. परंतु प्रवाशांना साध्या पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नसल्यामुळे नागरिक प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत आहेत.
विनाकारण होते दंडात्मक कारवाई
नागपूर शहरात सार्वजनिक प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी जाणाऱ्या नागरिकांना कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र, रेल्वेस्थानकात व्यवस्थाच नसल्यामुळे नागरिक रेल्वेस्थानकात प्रवेश करून प्लॅटफार्मवरील प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी जातात. बाहेर पडताना टीसीची नजर संबंधित नागरिकावर गेल्यास ते त्याला पकडतात. विनातिकीट समजून रेल्वेस्थानकात प्रवेश केल्याबद्दल २५० रुपये दंड ठोठावतात. यामुळे नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी
रेल्वे मंत्रालयाने अधिकाऱ्यांना रेल्वेस्थानक, परिसर, रेल्वेगाड्यात स्वच्छता राखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. वेळोवेळी रेल्वे प्रशासन पथनाट्य, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करते. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर मात्र साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून न दिल्यामुळे स्वच्छता अभियानाला रेल्वे प्रशासनाने तिलांजली दिल्याचा भास होत आहे. येथे स्वच्छतेबाबत कोणतीच खबरदारी प्रशासन घेताना दिसत नसल्यामुळे स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी होत असल्याचे चित्र आहे.