कळमना बाजारात शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:07 PM2024-12-03T17:07:10+5:302024-12-03T17:08:47+5:30
ढगाळ वातावरणामुळे नुकसानीची भीती : कुठलीही सुरक्षा नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले धान दोन पैसे मिळावेत म्हणून कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणले आहे. हजारो पोत्यांमध्ये भरलेले लाखो क्विंटल धानसाठा मार्केटमध्ये उघड्यावर पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. येत्या ५ डिसेंबरपर्यंत परिस्थिती कायम राहणार आहे. अशात अवकाळी पाऊस झाल्यास मोठे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
नागपूर व भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आपला माल विकण्यासाठी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणतात. दलालाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना धान विकले जाते. कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांचे वर्चस्व आहे. दलाल आपल्या फायद्यासाठी शेतमालाच्या किमती पाडतो. त्यामुळे शेतकरी अपेक्षित भाव मिळावा म्हणून माल बाजार समितीतच पुढे काही दिवस ठेवतो. सध्या कळमना बाजारात धानाची आवक सुरू झाली आहे. किमान १० हजारांवर धानाची पोती सध्या बाजारात उघड्यावर आहे. दक्षिण भारतात जोरदार पाऊस सुरू आहे, तर हवामान खात्याने नागपुरात ५ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तविला आहे. फंगल हे चक्रीवादळ अरबी समुद्राकडे सरकल्यास ढगाळ वातावरण आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.
गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याचा अंदाज नागपुरात नसला तरी सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पावसाची भीती आहे. तीन वर्षांपूर्वी याच सिजनमध्ये अवकाळी पाऊस झाला होता आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले होते. सध्या कळमन्याच्या पार्किंग एरियामध्ये धान साठविले जात आहे आणि ते उघड्यावर आहे.
"एवढा मोठा शेतमाल शेतकरी आणत असताना त्यांच्या मालाच्या सुरक्षेची जबाबदारी समितीची आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आल्या होत्या; परंतु त्या आता शेतकयांच्या पिळवणुकीचे अड्डे झालेल्या आहेत, असेच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांच्या भरवशावर दलालांच्या संपत्तीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांसाठी सुविधा न पुरविल्याने त्यांनी घाम गाळून पिकविलेले अन्न कवडीमोल ठरत आहे."
- संजय सत्यकार, शेतकरी