संघर्षमय जीवन प्रवासात खरोखरच 'लक्ष्मी' बनली !
By गणेश हुड | Published: June 6, 2023 10:42 AM2023-06-06T10:42:36+5:302023-06-06T10:44:11+5:30
प्रेरणा वाट : लक्ष्मी मडावी यांची वाटचाल महिलांसाठी प्रेरणादायी
नागपूर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हिवरा बाजार (ता. रामटेक) येथील आदिवासी कुटुंबातील लक्ष्मी मडावी यांची संघर्षमय वाटचाल इतर महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. दोन हाताला काम मिळावे यासाठी होणारी भटकंती थांबावी, यासाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या भांडवलातून चहा टपरी सुरू केली. आज त्या हॉटेल मालक बनल्या आहेत. लक्ष्मी यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या घरात लक्ष्मी आली आहे.
लक्ष्मी यांच्या कुटुंबात आई-बाबा व दोन भावंडे. घरात आठराविश्व दारिद्र्य असल्याने लक्ष्मी यांना कसेबसे पाचवी पर्यंत शिक्षण घेता आले. पायपीट केल्याशिवाय दोन वेळेचे जेवण नशिबी नसायचे. आई-वडील अंगमेहनतीचे काम करायचे, त्यांच्यासोबत लक्ष्मी काम करू लागल्या. अशातच मडावी परिवाराचे स्थळ आले आणि लग्न सोहळा पार पडला. सुखी संसार औटघटकेचाच ठरला. काही दिवसानंतर त्यांच्या पतीची प्रकृती खालावली. अन् काही दिवसातच ते स्वर्गवासी झाले.
पतीचे निधन झाल्याने लक्ष्मी मडावी यांच्यावर संकट कोसळले. त्यात सासरच्या कुटुंबात भांडणे सुरू झाली. यातच त्यांना सासर सोडून माहेरी परतावे लागले. परंतु घरची परिस्थिती बिकटच होती. त्यांना अभियान विषयी माहिती मिळाली. त्यांना समूहाचे महत्व पटले. नवी उमेद निर्माण झाली. त्यांनी समूहाची स्थापना करून त्याही सदस्य बनल्या. समूहाच्या बैठकीत दससुत्रीवर तसेच लघु उद्योगावर चर्चा व्हायची. त्यांच्या समूहाला शासकीय अनुदान १५ हजार रुपये मंजूर झाले. त्यातून त्यांनी पाच हजार रुपये अंतर्गत कर्ज घेऊन छोटासा चहाचा स्टॉल सुरू केला. सुरूवातीस ग्राहक दुकानात येईना. पण त्यांनी हिम्मत सोडली नाही.
चहा टपरी चालक ते हॉटेल मालक
लक्ष्मी मडावी यांनी सुरुवातील तीन-चार वर्षे त्यांनी चहा विकला. एक एक पैसा जमा करून त्यांनी चहा दुकानासोबतच एक हॉटेल सुरू केले. हॉटेलमध्ये नास्ता, चहासोबत जेवणाचे ऑर्डर येऊ लागल्या. शासकीय कार्यालयात जेवण पुरविणे सुरू झाले. सुरुवातीचा पाच हजारांच्या भागभांडवलात सुरु केलेला व्यवसाय आज दिवसाला पंधरा ते वीस हजारावर पोहचला. स्वत: कामासाठी भटकणाऱ्या लक्ष्मी मडावी यांच्याकडे आज कामाला नोकर असून त्या हॉटेल मालक बनल्या आहेत. उमेद अभियानाची ही किमया आहे.