कॉम्रेडला लाल सलाम

By admin | Published: January 3, 2016 03:26 AM2016-01-03T03:26:53+5:302016-01-03T03:26:53+5:30

कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. भाई बर्धन यांच्या निधनाने देशाने कामगारांसाठी आयुष्यभर लढणारा एक आदर्श नेता गमावला आहे. त्यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही.

Lal salute to comrade | कॉम्रेडला लाल सलाम

कॉम्रेडला लाल सलाम

Next

आदर्श नेता गमावला : मान्यवरांनी व्यक्त केली शोकसंवेदना
नागपूर : कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. भाई बर्धन यांच्या निधनाने देशाने कामगारांसाठी आयुष्यभर लढणारा एक आदर्श नेता गमावला आहे. त्यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. बर्धन हे राजकारणापलिकडील प्रामाणिक व आदर्शवादी नेते होते. त्यांची उणीव देशाला सदैव जाणवेल, अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केली.

नागपूरच्या भूषणाला गमावले

ए. बी. बर्धन यांच्या निधनामुळे कम्युनिस्ट पक्षाची मोठी हानी झाली. या पक्षाच्या मोठ्या पदापर्यंत पोहोचून त्यांनी नागपूरचे वैभव वाढविले. देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या उपराजधानीचा गौरव वाढविला. त्यांच्या निधनाने भारतीय राजकाणाची भरून न निघणारी हानी झाली आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे,
पालकमंत्री, नागपूर जिल्हा

कामगार चळवळ पोरकी झाली
बर्धन यांच्या निधनाने कामगार चळवळ पोरकी झाली आहे. आपले पूर्ण आयुष्य त्यांनी कम्युनिस्ट पक्ष आणि कामगार चळवळीला समर्पित केले होते. ते केवळ राजकीय पुढारीच नव्हते तर एक उत्तम सामाजिक कार्यकर्तेही होते. माझे आणि त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांच्या रूपात मी एक व्यक्तिगत मित्रही गमावला आहे.
- दत्ता मेघे, माजी खासदार

नागपूरचे मोठे नुकसान
कॉम्रेड बर्धन हे राजकारणातील मोठे प्रस्थ होेते. नागपूरच नव्हे तर देशभरात त्यांना मान होता. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी सोडली असती तर ते मोठ्या पदावर राहिले असते. परंतु त्यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. कामगारांसाठी ते आयुष्यभर लढले. त्यांची विचारसरणी वेगळी असली तरी ते महात्मा गांधी यांच्यासारखे जीवन जगले. त्यांच्या निधनाने पक्षासोबतच नागपूरचे मोठे नुकसान झाले.
- गेव्ह आवारी, माजी खासदार

तत्त्वांशी प्रामाणिक
भाई बर्धन हे कामगारांचे कल्याण व त्यांच्या हक्कासाठी लढणारे नेते होते. ते त्यांच्या तत्त्वांशी प्रामाणिक होते. आपल्य वक्तृत्व शैलीने त्यांनी अनेक सभा गाजविल्या. त्यांचा अभ्यास दांडगा होता. कठीण विषयावरही ते ठाम मत मांडत होते. पक्ष, राजकारण या पलिकडे जाऊन त्यांची सर्वाशी मैत्री होती. त्यांच्या नेतृत्वात डाव्या चळवळीला मोठे पाठबळ मिळाले. माझी त्यांच्याशी व्यक्तिगत मैत्री होती.त्यांच्या निधनाने देशाने एक लढवय्या नेता गमावला आहे.
बनवारीलाल पुरोहित, माजी खासदार

संघर्षशील नेत्याला देश मुकला
कामगारांसाठी आयुष्यभर झटणारे कॉ. ए.बी. बर्धन यांच्या निधनाने देश एका कर्मनिष्ठ, संघर्षशील नेत्याला मुकला आहे. बर्धन हे राजकारणापलिकडील प्रामाणिक व आदर्शवादी नेते होते. त्यांच्या निधनाने नागपूरसह देशाचे मोठे नुकसान झाले आहे. मी माझ्यातर्फे व भाजपातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
- अजय संचेती, खासदार

कम्युनिस्ट चळवळीची हानी
-एक सामान्य जीवन जगणारा नेता म्हणून कॉम्रेड बर्धन ओळखले जात. त्यांनी त्यांच्या कार्याने नागपूरचे नाव संपूर्ण जगात पोहोचविले. त्यांच्या अचानक जाण्याने कम्युनिस्ट चळवळीची मोठी हानी झाली. ती पोकळी भरून निघणे अशक्य आहे.
- कृपाल तुमाने, खासदार, रामटेक

उत्तम नेता गमावला
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए.बी.बर्धन यांनी नागपूरचे नाव देशभरात नेले. त्यांनी तत्त्वाचे राजकारण केले. राजकीय विचारधारा वेगळी असली तरी अशा प्रामाणिक व निष्कलंक नेत्याला गमावले आहे. त्यांच्या निधनाने नागपूरचेच नव्हे तर देशाचे मोठे नुकसान झाले
-प्रवीण दटके, महापौर

चळवळीचे नुकसान

कॉम्रेड ए.बी.बर्धन आयुष्यभर चळवळीसोबत एकनिष्ठ होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य पक्षासाठी व कामगारांसाटी खर्च केले. कम्युनिस्ट पक्षातील सर्वोच्च पद भूषवून त्यांनी नागपूर शहराची शान वाढविली. त्यांच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळीसोबतच नागपूर शहराचे मोठे नुकसान झाले.
- आ. सुधाकर देशमुख

नागपूरच्या जडणघडणीत मोलाचा वाटा
राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारे एक व्यक्तिमत्त्व आज आपण गमावलेले आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ए.बी. बर्धन साहेबांचा सिंहाचा वाटा होता. कामगार क्षेत्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे हे नागपूर शहर विसरू शकत नाही. त्यांच्या निधनाने नागपूरचे फार मोठे नुकसान झाले आहे.
-आ. अनिल सोले

यशस्वी पक्षसंघटक
विदर्भाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची बाब असलेल्या नागपूर कराराच्या वेळी ए. बी. बर्धन यांनी विदर्भाबाबत काही मागण्या केल्या होत्या त्यावेळी त्यांना आश्वासनही देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सूचना मांडल्या. केळकर समितीचा अहवाल मांडला; त्यावेळी मी बर्धन यांचा सभागृहात उल्लेख करीत विदर्भातील प्रश्नांबाबत बर्धन यांनी नागपूर कराराच्या वेळीच प्रकाश टाकला असल्याचे सभागृहात सांगितले. कामगारांचे अत्यंत निष्ठेने त्यांनी नेतृत्व केले. विदर्भाचा माणूस देशाच्या राजकारणात देशपातळीवर पोहोचून पक्षसंघटन करण्यात यशस्वी भूमिका वठविली. त्यांच्या निधनाने मोठ्या नेत्याला आम्ही मुकलो आहे.
- राजेंद्र मुळक, माजी मंत्री


नागपूरकरांना अभिमान
विदर्भासह देशभरातील विविध राजकीय पक्षात ए.बी.बर्धन यांच्या विषयी आदर होता. नागपुरातील जनतेला त्यांचा अभिमान होता. त्यांच्या निधनाने देशातील गरिबांना विचार देणारा नेता हरपला आहे.
-गिरीश गांधी, सामाजिक कार्यकर्र्ते

विदर्भभूषण गमावला
कॉम्रेड बर्धन हे खऱ्या अर्थाने कम्युनिस्टांचे आधारवड होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी कम्युनिस्ट चळवळ वाढविण्याचे काम यथार्थपणे केले. नागपूर कराराच्या वेळी विधिमंडळात त्यांनी आमदार म्हणून मौलिक सूचना केल्या. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. विदर्भभूषण म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या जाण्याने देशाचे, राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.
- अनिल देशमुख, माजी मंत्री

मोठ्या नेत्याला गमावले
ए. बी. बर्धन यांनी देशाच्या राजकारणात, राजधानीत महाराष्ट्राच्या उपराजधानीचे नाव उंचावले. राजकारणी असले तरी त्यांच्या शब्दांवर प्रत्येकाचा विश्वास होता. असा नेता १०० वर्षांत एखादाच होतो. कामगार चळवळीसोबतच सामाजिक भान असलेले ते व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने मोठ्या नेत्याला आम्ही गमावले आहे. कम्युनिस्ट चळवळीचे यामुळे मोठे नुकसान झाले.
- सुबोध मोहिते, माजी केंद्रीय मंत्री

आदर्श राजनेता
कॉम्रेड ए. बी. बर्धन यांच्या जाण्याने कम्युनिस्टांचा एक अध्याय संपला. देशाचे आदर्श राजनेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील. कधीही पराभव मानायचा नाही आणि माणूस कितीही मोठा झाला तरी तो सर्वसामान्य जीवनाचा भाग आहे, या दोन पैलूंची त्यांनी जोपासना केली. त्यांच्याशी जवळून संबंध आला. त्यामुळे माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले. असा नेता होणे नाही.
- जम्मू आनंद,कामगार नेते

डाव्यांना वैचारिक बैठक देण्याचे काम
डाव्यांचे वैचारिकत्व निर्माण करण्यात भाई बर्धन यांचा मोठा वाटा आहे. समाजात कुठेही दिशाभूल होणार नाही, याची काळजी त्यांनी सातत्याने घेतली. शोषितांसाठी काम करताना धर्मभेदाच्या भिंती कशा गळून जाव्यात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बर्धन होते. त्यांनी कामगार चळवळीला एक दिशा दिली. नागपूरच्या मातीतच ते मोठे झाले आणि येथूनच त्यांच्या कारकीर्दीला मोठे वळण लाभले. त्यांच्या निधनाने एक मार्गदर्शक हरविला.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ साहित्यिक

मार्गदर्शक हरविला
कॉम्रेड ए.बी.बर्धन यांच्या निधनाने वीज कामगार, विणकर, खाण कामगार, मजूर व भूमिहीन शेतकऱ्यांचा मसिहा हरपला आहे. ते एक आघाडीचे नेते होते. वयाच्या १५ वर्षापासून ७५ व्या वर्षापर्यत ते कामगार चळवळीत सक्रिय होते. सर्व राजकीय पक्षात त्यांचा आदर होता.
-मोहन शर्मा,वीज कामगार नेते

डाव्या आघाडीचे नुकसान
बर्धन यांच्या निधनाने डाव्या आघाडीचे मोठे नुकसान झाले आहे देशाला योग्य राजकीय दिशा देण्याची गरज असताना आपण त्यांना गमावले. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे.
-डॉ. रतिनाथ मिश्रा

Web Title: Lal salute to comrade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.