लालपरी असुरक्षित, अग्निशमन यंत्र गायब ! आग लागल्यास कसा होईल बचाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 09:21 PM2021-02-20T21:21:34+5:302021-02-20T21:24:36+5:30

Lalpari insecure, nagpur news प्रवासात अनेकदा आग लागल्यामुळे बसमधील प्रवाशांचा होरपळून मृत्यू होतो. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या बहुतांश बसची पाहणी केली असता या बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

Lalpari insecure, fire extinguisher disappears! How to escape in case of fire | लालपरी असुरक्षित, अग्निशमन यंत्र गायब ! आग लागल्यास कसा होईल बचाव

लालपरी असुरक्षित, अग्निशमन यंत्र गायब ! आग लागल्यास कसा होईल बचाव

googlenewsNext
ठळक मुद्देप्रथमोपचार पेट्याही रिकाम्या 

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : प्रवासात अनेकदा आग लागल्यामुळे बसमधील प्रवाशांचा होरपळून मृत्यू होतो. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या बहुतांश बसची पाहणी केली असता या बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. अनेक बसमध्ये अग्निशमन यंत्र आहेत. परंतु ते कालबाह्य झाल्याचे दिसले. त्यामुळे आगीची घटना घडल्यास प्रवाशांची जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अग्निशमन यंत्र नसलेल्या/कालबाह्य झालेल्या बसेस

गडचिरोली आगार बस क्रमांक-एमएच ४० एक्यु-६२३३ अग्निशमन यंत्र नव्हते

तिरोडा आगार बस क्रमांक-एमएच ४० वाय-५४८७ अग्निशमन यंत्र नव्हते

मोर्शी आगार बस क्रमांक-एमएच ०६ एस-८९५९ अग्निशमन यंत्र नव्हते

परतवाडा आगार बस क्रमांक-एमएच ४० वाय-५८४३ कालबाह्य अग्निशमन यंत्र

रामटेक आगार बस क्रमांक-एमएच १४ बीटी-४६६३ अग्निशमन यंत्र नव्हते

प्रथमोपचार पेट्या रिकाम्या

प्रवासात अनेकदा बसचा अपघात होतो. प्रवाशांना दुखापत होते. परंतु त्यांच्यावर प्रथमोपचार करण्याची व्यवस्थाच बसमध्ये राहत नाही. ‘लोकमत’ने गणेशपेठ आगारातील बसेसची पाहणी केली असता प्रथमोपचाराच्या पेट्या रिकाम्याच असल्याचे दिसले. या पेट्यात एकही साहित्य उपलब्ध नव्हते. याबाबत वाहकांना विचारणा केली असता त्यांनी एसटी महामंडळाने प्रथमोपचाराचे साहित्यच उपलब्ध करून दिले नसल्याचे सांगितले. त्यामुळे अपघात झाल्यास संबंधित प्रवाशांवर कसा प्रथमोपचार करावा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

वायफायचे बॉक्स बंदच

खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळ अनेक उपाययोजना करीत आहे. महामंडळाने एसी शिवशाही बसेस आपल्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. यातच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बसमध्ये वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे प्रवासी मोफत इंटरनेटचा वापर करीत होते. परंतु आता हे वायफायचे बॉक्स बंद पडले आहेत. काही बसमधून तर हे बॉक्सही गायब झाल्याचे दिसले.

आगारात कोणीही जा, मनाई नाही

गणेशपेठ आगारात अनेक बसेस उभ्या असतात. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असतो. परंतु ‘लोकमत’चा प्रतिनिधी आत जात असताना सुरक्षारक्षकही जागेवर नव्हता. थेट आगारात प्रवेश करता आला. यामुळे भविष्यात कोणीही आगाराच्या परिसरात जाऊ शकतो ही बाब सिद्ध झाली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आगारात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची विचारपूस होणे गरजेचे आहे.

अग्निशमन यंत्र नसलेल्या आगारांना सूचना देणार

‘गणेशपेठ आगारातील सर्वच बसेसमध्ये अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. बाहेरील आगाराच्या बसेसमध्ये अग्निशमन यंत्र नसल्यास संबंधित आगारांना सूचना देऊन अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात येईल. तसेच आगारात प्रवेश करणाऱ्यांची नोंदणी करूनच यापुढे आगारात प्रवेश देण्याबाबत खबरदारी घेऊ.’

- अनिल आमनेरकर, व्यवस्थापक, गणेशपेठ आगार

Web Title: Lalpari insecure, fire extinguisher disappears! How to escape in case of fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.