मिहान-खापरीचे भूसंपादन, पुनर्वसन दोन महिन्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:50 AM2019-08-17T00:50:27+5:302019-08-17T00:51:26+5:30
मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत दिले.
बैठकीला रवींद्र कुंभारे, प्रकाश पाटील, अविनाश कातडे, एमएडीसीचे चहांदे व शेकडो गावकरी उपस्थित होते. गावठाणाच्या पुनर्वसनाला शासनाने मंजुरी दिली आहे. वर्धा रोडच्या पूर्वीकडे पुनर्वसन होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सर्वे नं २२७ आणि २२८ मधील ३.२२ हेक्टर जमीन भूसंपादन करायची आहे. भूसंपादनापूर्वी ही जमीन मिहानच्या नावाने होती. त्यामुळे भूसंपादनात अडचणी निर्माण झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने आता रेकॉर्ड दुरुस्ती केली. जोपर्यंत मिहानकडून भूसंपादनाचा निधी येणार नाही, तोपर्यंत कलम १९/३ची कारवाई करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मिहानकडे निधी तयार आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केल्यानंतर लगेच भूसंपादनाची कारवाई होऊन पैसे वाटप केले जातील. या कारवाईसाठ़ी दोन महिन्याचा अवधी लागणार आहे. झोपडपट्टीचाही पुनर्वसनात समावेश केला जाणार आहे. भूखंड वाटपासाठ़ीची यादी तयार आहे. या यादीवर १२४ आक्षेप आले असून भूसंपादन कार्यालयाकडे ते पाठविण्यात आले. आक्षेप निकाली निघाले की आठवडाभरात प्लॉट वाटपही करण्यात येणर आहे. शेतकºयाला ३००० चौ. फूट, शेतकरी नसेल त्याला १५०० चौ. फूट आणि अतिक्रमणधारक असेल तर त्याला १००० चौ. फूट प्लॉट दिला जाईल. बांधलेले घर पुनर्वसनाच्या जागेवर स्थलांतरित करण्यात येईल. त्यासाठी ट्रक आणि १० हजार रुपये मिहानकडून देण्यात येतील.
गावठाणाची हद्द ठरवताना नगर भूमापन विभागाने काही चुका केल्या आहेत, त्या सुधारणे आवश्यक आहे. यासाठ़ी पुन्हा मोजणी करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. नागरी सुविधा मिहानने त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नवीन जागेचे पट्टेवाटपही लवकर करण्याचे निर्देश देण्यात आले. या भागात असलेली म्हाडाची कॉलनी मिहानला हस्तांतरित करण्यात आली आहे. पुढच्या वर्षभरात संपूर्ण गाव नवीन जागेवर वसलेले असेल. ज्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळाले, पैसे मिळाले, त्यांची जागा मिहानने ताब्यात घ्यावी. तसेच ज्यांना घरे मिळाली पण त्यांनी भाड्याने दिले असेल तर भाडेकरूंनी रिकामे करावे असेही सांगण्यात आले.