अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू; गडकरी आणि फडणवीस यांचे निर्देश

By कमलेश वानखेडे | Published: May 12, 2023 06:58 PM2023-05-12T18:58:20+5:302023-05-12T18:58:48+5:30

Nagpur News अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशन या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.

Land acquisition process for intermodal station at Ajani begins; Directed by Gadkari and Fadnavis | अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू; गडकरी आणि फडणवीस यांचे निर्देश

अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू; गडकरी आणि फडणवीस यांचे निर्देश

googlenewsNext

कमलेश वानखेडे

नागपूर : अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशन उभारण्यासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृह, रेल्वे, पाटबंधारे विभाग, भारतीय अन्न महामंडळ आणि वैद्यकीय महाविद्यालयाची जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.


अजनी इंटरमॉडेल स्टेशन व बस पोर्ट निर्मिती, कृषी कन्व्हेंशन सेंटर आणि लॉजिस्टिक पार्क, अंभोरा तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पाचा शुक्रवारी रवविभवन येथे गडकरी-फडणवीस यांनी आढावा घेतला. अजनी इंटरमॉटेल स्टेशनद्वारे वाहतूक आणि व्यावसायिक झोन उभारण्यात येणार असून प्रवासी व व्यावसायिकांसाठी येथे यात्री कॉम्पलेक्स, मॉल, पंचतारांकीत हॉटेल अशा उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच येथे बस पोर्टही उभारण्यात येणार आहे. कटरा ,वैष्णोदेवी येथे उभारण्यात येणाऱ्या बहुआयामी इंटरमॉडेल प्रकल्पाप्रमाणे हा प्रकल्प साकारावा, रेल्वे स्थानकाखालून जाण्या येण्याची व्यवस्था व्हावी अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सल्लागार बी.डी.थेंग,डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे , नागपूर मध्यवर्ती कारागृह, पाटबंधारे विभाग, भारतीय अन्न महामंडळ आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


कन्व्हेंशन सेंटरसाठी जागा वाढवून द्या
- दाभा परिसरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी कन्व्हेंशन सेंटर उभारताना नवी दिल्ली येथील प्रगती मैदान कॉम्पलेक्समधील प्रशस्त दालनाप्रमाणे मोठे हॉल निर्माण करण्यात यावे, उत्तम पार्किंग आणि इंटेरियर व्यवस्था, सौर ऊर्जेचा उपयोग व्हावा तसेच या सेंटरसाठी जागा अधिक वाढवून देण्याच्या सूचना गडकरी आणि फडणवीस यांनी दिल्या. या प्रकल्पांतर्गत प्रयोगशाळा, संरक्षक भिंती, ॲम्पी थिएटर, लँडस्केपिंग, सोलर पॅनल, आंतरिक रस्ते, पाणी , मलनि:सारण आदीं प्रारंभिक कामास गती देण्याचे निर्देशही देण्यात आले.

लॉजिस्टिक पार्कसाठी योग्य जागेची निवड करावी
- नागपुरात उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्क संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. हे पार्क भव्य व एकत्र असावे. समृद्धी महामार्गाचाही उपयोग व्हावा. याठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधा असाव्यात जेणे करून मध्यवर्ती नागपूर शहराचे महत्व वाढावे तसेच मोठया कंपन्यांना त्याची मदत व्हावी, यासाठी योग्य जागेची निवड करावी आणि तसा प्रस्ताव सादर करावा, अशी फडणवीस- गडकरी यांनी केली.

कुही तालुक्यातील अंभोरा तिर्थक्षेत्र विकास प्रकल्पाचाही आढावा यावेळी घेण्यात आला. या तिर्थक्षेत्राची भौगोलिक स्थिती पाहता या प्रकल्पास साहसी व जल पर्यटनाची जोड देण्याची सूचना करण्यात आली. या प्रकल्पाबाबत सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून पर्यटन विभागाकडे पाठवण्याच्या सूचनाही यावेळी श्री फडणवीस यांनी केल्या. नागपूर व भंडारा जिल्हयांच्या सिमेवरील हा प्रकल्प असून दोन्ही जिल्हयाच्या एकत्रित प्रस्ताव पर्यटन विभागाला पाठविण्यात यावा ,अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली.

Web Title: Land acquisition process for intermodal station at Ajani begins; Directed by Gadkari and Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.