बोगस कागदपत्रांद्वारे जमिनीचा फेरफार

By admin | Published: January 12, 2015 01:03 AM2015-01-12T01:03:05+5:302015-01-12T01:03:05+5:30

तालुक्यातील बारई (बरेजा) समाजबांधवांच्या उदरनिर्वाहासाठी ब्रिटिश राजवटीत १८९२-९५ च्या काळात २३६ एकर जमिनीची पारशिवनी बरेजा प्रगणे भिवगड नावाने शासन दप्तरी नोंद आहे.

Land change by bogus documents | बोगस कागदपत्रांद्वारे जमिनीचा फेरफार

बोगस कागदपत्रांद्वारे जमिनीचा फेरफार

Next

बरेजा पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
चंद्रशेखर गिरडकर - पारशिवनी
तालुक्यातील बारई (बरेजा) समाजबांधवांच्या उदरनिर्वाहासाठी ब्रिटिश राजवटीत १८९२-९५ च्या काळात २३६ एकर जमिनीची पारशिवनी बरेजा प्रगणे भिवगड नावाने शासन दप्तरी नोंद आहे. ही जमीन बरेजा समाजबांधवांना नाममात्र भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. स्थानिक तहसील कार्यालयात बोगस कागदपत्र सादर करून या जमिनीचा फेरफार करण्यात आल्याचा आरोप बरेजा पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
बारई (बारी) समाजबांधवांनी १८९२ ते ९५ च्या काळात ‘वाजीब-उल-अर्ज’च्या घटनेनुसार सर्वानुमते बरेजा पंच कमिटी या नावाने संचालक मंडळ नेमले. ‘वाजीब-उल-अर्ज’नुसार २८३ पट्टेदार सभासदांमधून नंबरदार निवडून त्यांच्याकडे संस्थेच्या चल-अचल संपत्तीची देखरेख असायची. यात मालगुजार, पाटील, वहिवाटदार व आता येथे अध्यक्षप्रणाली अस्तित्वात आहे. त्यानुसार सन २०११ पासून या बरेजा पंच कमिटीचे अध्यक्ष म्हणून वसंत महाजन, सचिव केशव पोकळे यांचे संचालक मंडळ कार्यरत होते.
या मंडळाचा कार्यकाळ एप्रिल २०१४ मध्ये संपला असताना, संबंधित संचालक मंडळाने बरेजा पंच कमिटीची मालमत्ता खाजगी समजून घटनेची नियमावली धाब्यावर बसवून, सन २०१३ मध्ये संस्थेचे नाव ‘नागवेल पान उत्पादक संस्था’ असे नामकरण करून मूळ जमिनीच्या सातबारावर नागवेल पान उत्पादक तथा कृषी संयुक्त सहकारी संस्था म्हणून बनावट कागदपत्रांच्या आधारे सातबारावर फेरफार केला. याचा फेरफार क्र. ३, ५ जुलै २०१३ नुसार नोंद आहे. या संस्थेची अधिकृतपणे कुठेही नोंद नाही.
सन २०१३-१४ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीवर काही पट्टेदारांनी आक्षेप घेतला. बरेजा पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक तलाठ्याला या जमिनीचा अभिलेख, सातबारा, आठ अ व नकाशाची मागणी केली. तलाठ्याने दिलेल्या सातबाराप्रमाणे सर्वे क्र. ५, ६, ६८ या अभिलेखावर बरेजा पंच कमिटी संस्थेच्या नावाऐवजी नागवेल पान उत्पादक तथा कृषी संयुक्त सहकारी संस्था मर्यादित, खातेदार एकूण २१४ असा उल्लेख केला असून, या जमिनीचे मूळ मालक बदलविण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल) रामटेक, तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांना १०० पट्टेदारांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.
या संस्थेचे आज वारसान हक्काप्रमाणे ४५० पट्टेदार सभासद आहेत. महसूल विभागातील दस्तऐवजावरील नोंदीनुसार या जमिनीवर बरेजा पंच कमिटीचा सामूहिक मालकी हक्क आहे. पूर्वी वाजीब-उल-अर्जनुसार पट्टेदारांमधून नंबरदार निवडून त्याच्याकडे संस्थेची व मालमत्तेची देखरेख असे. या जमिनीचा फेरफार करण्यात आल्याने पट्टेदार सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Land change by bogus documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.