ज्येष्ठांच्या आनंदाश्रमासाठी जमीन दान
By Admin | Published: October 29, 2015 03:24 AM2015-10-29T03:24:38+5:302015-10-29T03:24:38+5:30
आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळाची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा २५ रोजी वासवी कल्याणमंडपम्, रामनगर येथे पार पडली.
नागपूर : आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळाची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा २५ रोजी वासवी कल्याणमंडपम्, रामनगर येथे पार पडली. अध्यक्षस्थानी वेकोलिचे निवृत्त संचालक द.रा. मामीडवार तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल इंडियाचे निवृत्त आर्थिक संचालक अरविंद कोमावार होेते. महाराष्ट्र आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष गणेश चक्करवार हे विशेष आमंत्रित होते.
मंडळाने हाती घेतलेला ‘ज्येष्ठांसाठी आनंदाश्रम’ हा प्रकल्प या आमसभेचे प्रमुख आकर्षण होते. या प्रकल्पासाठी व्यंकटेश ऊर्फ राजू कुणावार यांनी आपल्या टाकळघाट येथील ले-आऊटमधील सर्व सोयींनीयुक्त अशी २६ हजार चौरस फूट जागा दान केली. या जागेची बाजारभाव किंमत एक कोटी रुपये आहे. जागेचे कागदपत्र आणि दानपत्र त्यांनी मंडळाच्या हवाली केले. मंडळातर्फे राजू कुणावर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष द.रा. मामीडवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समाजातर्फे राजू कुणावार यांच्या दानशूर वृत्तीबद्दल कौतुकांचा वर्षाव होत आहे. प्रकल्पाचे आर्किटेक्ट अंबरीश गोलावार यांनी प्रस्तावित आनंदाश्रमाच्या स्वरूपाबद्दल प्रोजेक्टरद्वारे सविस्तर माहिती दिली. त्यांचाही मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. प्रा. भाऊराव बिरेवार यांनी लेखानाच्या क्षेत्रात, गजानन कोटावर यांनी सामाजिक क्षेत्रात, रेखाताई गंधेवार यांनी काव्य लेखनाच्या क्षेत्रात केलेल्या विशेष कामगिरीसाठी त्यांचाही सत्कार करण्यात आला. समाजातील ८० वर्षांवरील ज्येष्ठांचासुद्धा सभेत सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठांनी नेत्रदान करवे आणि आपले इच्छापत्र लिहून ठेवावे, यावर भर देण्यात आला. मंगलगीत व पसायदान वासंती गुंडावार यांनी गायिले. संचालन मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद भास्करवार यांनी केले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेश तन्नीरवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.(वा. प्र.)