भूखंडावर कब्जा : ८० लाख रुपयांची खंडणी मागितली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 09:05 PM2020-08-06T21:05:35+5:302020-08-06T21:06:57+5:30
भूखंडावर कब्जा करून ८० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तीन महिलांसह चौघांविरुद्ध दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूखंडावर कब्जा करून ८० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तीन महिलांसह चौघांविरुद्ध दाखल केला. साईनाथ मुरलीधर जाधव (नरसाळा), ममता शकूर शेख (धरमपेठ), नलिनी राजेश बढिये (पांढराबोडी) आणि मीना किशोर हाडोळे (पांढराबोडी) अशी आरोपींची नावे आहेत.
मंगेश विजय काशीकर (रा. शंकरनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काशीकर आणि प्रशांत बळीराम सातपुते या दोघांच्या मालकीचा अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भूखंड आहे. या भूखंडावर १८ फेब्रुवारीपासून लॉकडाऊनमुळे दुर्लक्ष झाल्याचे पाहून उपरोक्त आरोपींनी कब्जा केला. तो सोडविण्यासाठी आपण आरोपींकडे विनंती केली असता त्यांनी काशीकर यांना मारहाण केली. तसेच विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. आमच्याकडे गुंडांची मोठी टोळी असून भूखंडाचा ताबा पाहिजे असल्यास चौघांना प्रत्येकी १५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर मंगळवारी आरोपी ममता तसेच नलिनी या दोघींनी काशीकर यांना फोन करून ८० लाख रुपयांची खंडणी मागितली. काशीकर यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी विविध कलमांनुसार उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.