२५ कोटींची जमीन हडपण्याचा डाव अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:41 AM2017-08-27T01:41:51+5:302017-08-27T01:42:24+5:30
बनवाबनवी करून २५ कोटींची जमीन अवघ्या साडेतीन कोटीत हडपण्याचा प्रयत्न करणारा आरोपी बिल्डर सागर रतन याने आणखी किती जणांची आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनवाबनवी करून २५ कोटींची जमीन अवघ्या साडेतीन कोटीत हडपण्याचा प्रयत्न करणारा आरोपी बिल्डर सागर रतन याने आणखी किती जणांची आणि कुठली कुठली जमीन हडपली, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र, या दोघांनी पोलीस कोठडीतील चौकशीत पोलिसांची दिशाभूल करण्याचे तंत्र अंगिकारले आहे. तसा अहवाल पोलिसांनी न्यायालयात आज सादर केल्यामुळे या दोघांना न्यायालयाने आणखी २८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बेसा येथे १९८७-८८ मध्ये मिलिंद सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. तत्कालीन सचिव शालिकराम ढोरे यांनी सोसायटीच्या मालकीची ४ एकर जागा ७० भूखंडधारकांना विकली. २००३ मध्ये ढोरे यांनी सचिवपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या उपस्थितीत संदीप विश्वलोचन जैन यांना अध्यक्ष तर त्यांचे मेव्हणे विकास रामचंद्र जैन यांना सोसायटीचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. कालांतराने आरोपी विकास जैनने आपल्या नातेवाईकांना सोसायटीचे सदस्य बनवून या कोट्यवधींच्या जमिनीवर कब्जा केला. न्याय मिळवण्यासाठी पोलिसांसह विविध विभागात तक्रारी केल्यानंतर पीडित भूखंडधारकांनी सहकार विभागाकडेही धाव घेतली. कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर ३१ मार्च २०१७ ला सोसायटीवर अवसायक नेमण्यात आला. त्याची माहिती कळताच सोसायटीचा सचिव विकास जैन याने आरोपी बिल्डर सागर रतन सोबत संगनमत केले. त्यानंतर मिलिंद सोसायटीची सुमारे २५ कोटींची जमीन केवळ ३ कोटी ५७ लाखात हडपण्याचा सागर रतनने कट रचला. विक्री करून घेतल्यानंतर ५ एप्रिलला जमिनीच्या ७/१२ वर आपले नाव नोंदवून तेथे बांधकामही सुरू केले.
दरम्यान, ग्वालबन्सी प्रकरणानंतर पीडित भूखंडधारकांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. त्यानंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाची प्रदीर्घ चौकशी करून गुन्हा दाखल केला.
२२ आॅगस्टला, मंगळवारी रात्री रतन आणि जैनला पोलिसांनी अटक केली. त्यांची दुसºया दिवशी पोलीस कोठडी मिळवली. चार दिवसांच्या चौकशीत बिल्डर रतनने पोलिसांसोबत टाइमपासचा खेळ चालविला आहे. आपल्याला सोसायटीसोबत भूखंडधारकांचा वाद असल्याची माहितीच नसल्याची बतावणी तो करीत आहे. आपली सर्व कागदपत्रे बरोबर असून, पैसे देऊन जमीन घेतल्याचा युक्तिवाद तो करीत आहे. आरोपींनी अशाच प्रकारे आणखी अनेकांसोबत बनवाबनवी केली असावी, असाही संशय आहे. त्यामुळे पोलीस त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत आहेत.
मात्र, बिल्डर रतन अनेक प्रश्नांची उत्तरे टाळताना तो दिशाभूल करणारी माहितीही देत आहे. जैनसुद्धा असाच प्रकार करीत असल्याने पोलिसांना पाहिजे तशी माहिती किंवा कागदपत्रे उपलब्ध झालेली नाही. दरम्यान आज शनिवारी त्यांच्या कोठडीचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. आरोपी पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसून, दिशाभूल करीत असल्याचे सांगून पोलिसांनी त्यांची कोठडी वाढवून देण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींची कोठडी २८ आॅगस्टपर्यंत वाढवून दिली.
बिल्डर रतनचे म्युटेशन रद्द
आरोपीने कटकारस्थान करून ही फसवणूक केली आहे आणि जमिनीच्या ७/ १२ वर नाव चढविले आहे, याचा माहितीवजा अहवाल एसआयटीने महसूल खात्याला पाठविला. उपविभागीय अधिकाºयांनी (एसडीओ) त्यावर तात्काळ कारवाईचा पवित्रा घेतला आणि भूमिअभिलेख विभागाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार भूमिअभिलेख विभागाने त्या जमिनीच्या ७/ १२ वर आरोपी सागर रतनचे झालेले नामांतर (म्युटेशन) रद्द केले.