भूधारक शेतकरी होणार भूस्वामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:00 AM2018-07-17T01:00:49+5:302018-07-17T01:08:46+5:30
राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच विदर्भातील लाखो भूधारक शेतकरी आता भूस्वामी होणार आहेत. सोमवारी विधान परिषदेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) आणि महाराष्ट्र जमीन महसूल महसूल विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषत: नागपूर व अमरावती जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच विदर्भातील लाखो भूधारक शेतकरी आता भूस्वामी होणार आहेत. सोमवारी विधान परिषदेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) आणि महाराष्ट्र जमीन महसूल महसूल विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषत: नागपूर व अमरावती जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
सभागृह नेते व महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी परिषदेत विवक्षित भूमिधारींचा भोगवटादार वर्ग १ मध्ये अंतर्भाव करण्यासाठी परवानगी देण्याबाबत विधेयक सादर केले. महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावरील भूभाग महाराष्ट्रात शामील झाला. तेव्हापासून विदर्भातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासकीय दस्तावेजांमध्ये वर्ग २ मध्येच दाखविण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन असूनही वर्ग २ मुळे शेतकरी सरकारच्या परवानगीशिवाय त्याची खरेदी विक्री करू शकत नव्हते. आता सरकारने त्या वर्ग १ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारतर्फे सरसकट याची अंमलबजावणी केली जाईल. विदर्भातील सर्व गावांचा यात समावेश केला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी या विधेयकाचे समर्थन केले. मात्र याचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत जावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. रामहरी रुपनवर, अनिल सोले, शरद रणपिसे, जोगेंद्र कवाडे, सुरेश धस यांनीदेखील या विधेयकासंदर्भातील चर्चेत भाग घेतला.