ताजबाग ट्रस्टच्या जागेवरही कुख्यात आबू टोळीचा कब्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:16 AM2021-09-02T04:16:00+5:302021-09-02T04:16:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - प्रसिद्ध ताजबाग ट्रस्टच्या जागेवर तसेच तेथील व्यापारी संकुलावर कब्जा करून कुख्यात ड्रगमाफिया आबू ऊर्फ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - प्रसिद्ध ताजबाग ट्रस्टच्या जागेवर तसेच तेथील व्यापारी संकुलावर कब्जा करून कुख्यात ड्रगमाफिया आबू ऊर्फ फिरोज खान, त्याचे भाऊ आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. तब्बल १५ वर्षांनंतर त्याच्या पापाचा घडा फुटला असून, या प्रकरणात पोलिसांनी आता आबू तसेच साथीदारांविरुद्ध सोमवारी पुन्हा एक गुन्हा दाखल केला.
कुख्यात आबू तसेच शहजादा खान अजीज खान, अमजद खान अजीज खान तसेच ईग्गा खान यांनी ताजबाग ट्रस्टच्या जागेवर व्यापारी संकुल आहे. तेथील दुकानांवर कुख्यात आबूने २००६ मध्ये कब्जा करून तेथून मोठ्या प्रमाणात किराया वसूल केला आहे. अमजद हुसेन गुलाम हुसेन (वय ४९) आणि त्यांच्या कुटुंबीयांना वितरित करण्यात आलेल्या दुकानांची बनावट कागदपत्रे तयार केली. त्यावर कब्जा करून ती दुकाने हुसेन यांना परत करण्यासाठी आरोपी आबू आणि साथीदारांनी हुसेन यांच्याकडून ५० हजार रुपये उकळले. सरकारी जागेला ट्रस्टची जागा सांगून तेथील दोन भूखंड आरोपींनी हुसेन यांच्या दोन बहिणींना विकले आणि त्या बदल्यात दोन लाख रुपये घेतले.
----
नवीन दुकानावर आबूची नजर
ताजबाग ट्रस्टतर्फे बनविण्यात येणाऱ्या नवीन दुकानांवरही आबूची नजर होती. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे या दुकानांवरही हक्क सांगितला होता. १० फेब्रुवारी २००६ पासून त्याची ही भाईगिरी सुरू होती. प्रचंड दहशत असल्यामुळे आबू तसेच त्याच्या टोळीतील गुंडांविरुद्ध कुणी बोलण्याची हिम्मत दाखवत नव्हते. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आबूच्या नेटवर्कवर नजर रोखल्याने आता त्याच्याविरुद्ध दोन दिवसांत ४ गुन्हे दाखल झाले तर आणखी काही गुन्हे अजून दाखल होणार आहेत.
----
पहिल्या प्रकरणात आबूच्या भावाला अटक
कोट्यवधींच्या जमिनीचा मालक असलेला मात्र आबूने मालमत्ता हडपल्याने फूटपाथवर राहत असलेल्या फिरदोस खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शफिक आणि बेबी तलमले यांच्या तक्रारीवरून आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हापासून पोलिसांची वेगवेगळी पथके आबू आणि साथीदारांचा जागोजागी शोध घेत आहेत. त्यातील एका पथकाला आबूचा भाऊ नसिम ऊर्फ छोटू खान हाती लागला. त्याला अटक करण्यात आली असून, पोलीस त्याला बोलते करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
---