नागपुरात जमिनीच्या व्यवहारात ४३ लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 12:21 AM2019-11-05T00:21:01+5:302019-11-05T00:22:29+5:30
दीड कोटी रुपयांत ५२ एकर जमीन देण्याची बतावणी करणाऱ्या एका टोळीने बांधकाम व्यावसायिक आणि सहकाऱ्यांची ४३ लाखांनी फसवणूक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीड कोटी रुपयांत ५२ एकर जमीन देण्याची बतावणी करणाऱ्या एका टोळीने बांधकाम व्यावसायिक आणि सहकाऱ्यांची ४३ लाखांनी फसवणूक केली. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या सौद्याचा व्यवहार वादग्रस्त झाल्यामुळे प्रकरण सीताबर्डी पोलिसांकडे पोहचले. त्यावरून पोलिसांनी एका महिलेसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जवाहर नवनीत कोठारी (वय ५६) हे या प्रकरणात तक्रारदार आहेत. ते तिरुपती रेसिडेन्सी मनीषनगर येथे राहतात. ते बांधकाम व्यावसायिक असून सीताबर्डीत त्यांचे कार्यालय आहे. मोहम्मद इकबाल हाजी मुसानी यांच्या मध्यस्थीने त्यांच्याकडे डिसेंबर २०१४ मध्ये आरोपी मुकेश राऊत याच्या जमिनीचा सौदा आला. १९ डिसेंबर २०१८ ला कोठारी यांच्या कार्यालयात राऊत याने मौदा हद्दीतील ५२ एकर शेती १ कोटी ५१ लाखांत विकण्याचा सौदा केला. कोठारी यांनी आपल्या चार सहकाºयांना सोबत घेऊन मोहम्मद इकबाल हाजी मुसानी यांच्या मध्यस्थीने जमीनमालक सुभाष गोविंद ढवळे, प्रकाश पंजाबराव राऊत, मोहम्मद जावेद सत्तार आणि राजेंद्र नारायण जाधव यांच्यासोबत जमीन खरेदीचा सौदा पक्का केला. यावेळी त्यांनी उपरोक्त आरोपींनी टोकन म्हणून पाच लाख रुपये दिले. त्यानंतर जमीन खरेदीचा करारनामा करून जमीनमालकांना ३१ लाख ७० हजार ३४३ रुपये चेकद्वारे दिले. त्यानंतर जमीन साफ करण्यासाठी आणि मोजणी करण्यासाठी मुकेश राऊत आणि इकबालभाई यांना ६ लाख ४६ हजार ९१५ रुपये दिले. अशाप्रकारे कोठारी यांनी आरोपींना एकूण ४३ लाख १७,२५८ रुपये दिले. आता या सौद्याला पाच वर्षे झाली, मात्र ती जमीन कोठारी यांच्या नावे आरोपींनी करून दिली नाही. आरोपी विनोद गवई आणि इकबालभाई यांनी कोठारी यांना फार्म हाऊसमध्ये भागीदारी करून आपण धंदा करू असे म्हटले. त्यामुळे इतर लोकांनी नवीन अरुणोदय असोसिएट नावाने फर्म बनवून पार्टनरशिप डीड तयार केली. रामनगर येथील कार्यालयात त्यांनी जमिनीची मूळ कागदपत्रे इकबालभाई यांच्या ताब्यात दिली. आरोपी मुकेश राऊत, इकबालभाई, प्राची विनोद गवई आणि प्रकाश श्रीधर पाबले तसेच उपरोक्त जमीनमालकांनी संगनमत करून ती जमीन आपल्या नावावर करून कोठारी यांचा विश्वासघात केला.
ते चौघे कोण?
१९ डिसेंबर २०१४ ते ९ सप्टेंबर २०१८ या कालावधीत आरोपींनी रक्कम हडपली म्हणून कोठारी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाने सीताबर्डी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस आता आरोपींवर कधी कारवाई करतात, त्याकडे लक्ष लागले आहे. दुसरे म्हणजे या प्रकरणात कोठारी यांच्यासोबत अन्य चार जण कोण आहेत, तेसुद्धा पोलिसांकडून उघड करण्यात आलेले नाही.