मृत अध्यक्षाचे नाव धारण करून विकली अंजुमन ट्रस्टची जमीन

By Admin | Published: May 8, 2015 02:19 AM2015-05-08T02:19:16+5:302015-05-08T02:19:16+5:30

अंजुमन हामी ए इस्लाम ट्रस्टची कळमेश्वरच्या कारली येथील जमीन ट्रस्टच्या मृत अध्यक्षाचे नाव धारण करून विकणाऱ्या एका आरोपीचा

Land of Wiki Anjuman Trust by holding the name of the deceased President | मृत अध्यक्षाचे नाव धारण करून विकली अंजुमन ट्रस्टची जमीन

मृत अध्यक्षाचे नाव धारण करून विकली अंजुमन ट्रस्टची जमीन

googlenewsNext

नागपूर : अंजुमन हामी ए इस्लाम ट्रस्टची कळमेश्वरच्या कारली येथील जमीन ट्रस्टच्या मृत अध्यक्षाचे नाव धारण करून विकणाऱ्या एका आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस. तरारे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड मीर अली यांनी काम पाहिले.
हबीबूर अब्दुल रहेमान (६५) असे आरोपीचे नाव असून, तो भालदारपुरा मोहम्मद अली चौक येथील रहिवासी आहे.
प्रकरण असे की, एम.ए. अजीज मोहम्मद खान हे अंजुमन हामी ए इस्लाम ट्रस्टचे अध्यक्ष असताना त्यांनी १९८२ मध्ये कारली या गावातील किसना कोठीराम कुबडे यांच्या मालकीची १०.३२ हेक्टर शेतजमीन खरेदी केली होती. खरेदीपासूनच ही जमीन पडित होती. १५ सप्टेंबर २००३ रोजी एम.ए. अजीज यांचे निधन झाले.
गैरफायदा घेत हबीबूर याने स्वत:ला एम.ए. अजीज असल्याचे भासवून ६ डिसेंबर २००३ रोजी या जमिनीचे विक्रीपत्र कळमेश्वरच्या उपनिबंधक कार्यालयामार्फत मोमीनपुरा येथील शेख इरफान शेख अब्दुल याच्या नावे करून दिले. त्यावेळी रफल मकसूद आलम बारी याने साक्षीदार म्हणून विक्रीपत्रावर सह्या केल्या होत्या. त्यानंतर ही जमीन शेख इरफान यांनी हरिप्रसाद साधूलाल शाह यांना विकली होती. पुढे या जमिनीची अनेकांना विक्री करण्यात आली. त्यात सुषमादेवी विनोदकुमार सराफ यांच्या एम. सराफ बंधू कंपनीचा समावेश होता.
या ट्रस्टच्यावतीने सदर येथील अंजुमन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाची इमारत कारली येथील ट्रस्टच्या या जमिनीवर बांधून ती हस्तांतरित करावयाची असल्याने या ट्रस्टचे लेखा अधिकारी सलीम जाकीर अख्तर हुसैन मिलवाला यांनी पटवारी कार्यालयात जाऊन या जमिनीच्या भूमापन संदर्भातील कागदपत्रे प्राप्त केली असता ही बनवाबनवी उजेडात आली. मिलवाला यांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून ७ आॅगस्ट २०१४ रोजी भादंविच्या ४१९, ४२०, ४२३, ४६७, ४६८, ४७१, ४७४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रारंभी शेख इरफान आणि रफल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर १३ जानेवारी २०१५ रोजी हबीबूरला अटक करण्यात आली. या प्रकरणी १३ एप्रिल २०१५ रोजीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आपल्याला जामीन मिळावा म्हणून हबीबूरने दाखल केलेला अर्ज प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने फेटाळला. (प्रतिनिधी)

Web Title: Land of Wiki Anjuman Trust by holding the name of the deceased President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.