विद्यापीठाच्या बीएडच्या परीक्षेत भाषेचा घाेळ; पेपर इंग्रजी माध्यमाचा अन् पर्याय मराठी उत्तरांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2022 12:55 PM2022-09-02T12:55:26+5:302022-09-02T13:31:33+5:30
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत दरराेज नवनवीन गाेंधळ
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत दरराेज नवनवीन गाेंधळ बघायला मिळताे आहे. नवीन प्रकरण बीएड द्वितीय सेमिस्टरच्या परीक्षेतील असून, यावेळी तर बेजबाबदारपणाच्या मर्यादाच ओलांडल्या आहेत. या बहुपर्यायी पेपरमध्ये इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत उत्तराचे पर्याय चक्क मराठी भाषेत देण्यात आले.
गुरुवारी बीएड द्वितीय सेमिस्टरच्या परीक्षेत ‘गांधीवादी दर्शन नवे शिक्षण आणि सामुदायिक जाेडण्याची पद्धत’ या विषयाचा पेपर हाेता. या पेपरमध्ये इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न विचारले हाेते. काही प्रश्नांत तर उत्तराच्या चार पर्यायांपैकी दाेन, तीन पर्याय चक्क मराठी भाषेत हाेते. काही प्रश्नात एकच पर्याय दाेनदा दिले हाेते.
प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांनी तत्काळ याबाबत तक्रार केली. बातमी लिहिस्ताेवर विद्यापीठाकडून याबाबत काेणतेही स्पष्टीकरण प्राप्त झाले नाही. पेपर रद्द हाेणार की हाच पेपर कायम राहणार, हे सुद्धा स्पष्ट करण्यात आले नाही. लाेकमतने विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण ताे हाेऊ शकला नाही.
प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करीत आहे. प्रश्नपत्रिका तयार करताना एवढी माेठी चूक कशी झाली, हा प्रश्न प्रत्येकाला पडताे आहे. विशेष म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करताना शिक्षकांचे पॅनल असते. या पॅनलद्वारे प्रश्नपत्रिकेला अंतिम रूप देण्यापूर्वी दाेन-तीन वेळा तपासले जाते. यात इंग्रजीच्या स्पेलिंग व ग्रामरची कठाेर तपासणी हाेते. असे असताना या प्रश्नपत्रिकेत एवढी माेठी चूक झाली कशी, हेच माेठे आश्चर्य ठरले आहे.
विद्यार्थ्यांकडून तयार केली प्रश्नपत्रिका?
प्रश्नपत्रिकेच्या चुका पाहिल्यावर असे वाटते की, विद्यापीठाने ही प्रश्नपत्रिका शिक्षकांकडून नाही तर एखाद्या विद्यार्थ्याकडून तयार केली असावी, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आश्चर्य म्हणजे शिक्षकांच्या पॅनलनेही डाेळे बंद करून प्रश्नपत्रिकेला अंतिम रूप दिले असावे. त्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागालाही प्रश्नपत्रिका तपासणे गरजेचे वाटले नाही.