लांजेवार-हजारे वाद भडकला

By Admin | Published: July 31, 2014 01:09 AM2014-07-31T01:09:47+5:302014-07-31T01:09:47+5:30

गेल्या अडीच महिन्यांपासून धुमसत असलेला लांजेवार - हजारे वाद आज पुन्हा भडकला. पुरुषोत्तम हजारेच्या गुंडांनी आज जगदीश लांजेवारवर तीन गोळ्या झाडल्या. नंतर चाकू, तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Lanjevar-Hazare controversy shocked; | लांजेवार-हजारे वाद भडकला

लांजेवार-हजारे वाद भडकला

googlenewsNext

पारडीत गोळीबार : प्रचंड तणाव
नागपूर : गेल्या अडीच महिन्यांपासून धुमसत असलेला लांजेवार - हजारे वाद आज पुन्हा भडकला. पुरुषोत्तम हजारेच्या गुंडांनी आज जगदीश लांजेवारवर तीन गोळ्या झाडल्या. नंतर चाकू, तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नशीब बलवत्तर म्हणून लांजेवार बचावला. या घटनेमुळे पारडी कळमन्यात आज रात्री प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिवसांपासून लांजेवार हजारे यांच्यातील वाद अधिकच तीव्र झाला. एकमेकांवर सशस्त्र हल्ला करणे, जमाव घेऊन चालून जाणे, पोलिसांकडे परस्पर विरोधात तक्रारी नोंदवणे, असे प्रकार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर,आज रात्री ७ च्या सुमारास जगदीश लांजेवार आपल्या पारडीतील घराजवळ त्याच्या चुलत भावासोबत गप्पा करीत होता. तेवढ्यात तीन मोटरसायकलीवर नऊ हल्लेखोर आले. त्यांनी देशी कट्ट्यातून लांजेवारवर तीन गोळ्या झाडल्या. लांजेवारने नेम चुकवून जीव वाचवला आणि आपल्या घरात पळून गेला. त्याच्या पाठोपाठ चाकू आणि तलवारी घेऊन आरोपीही आले. दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकून लांजेवारचे नातेवाईक, समर्थक मोठ्या प्रमाणात आरोपींच्या मागे धावले. त्यामुळे आरोपी पळून गेले. या घटनेनंतर पारडी-कळमन्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती कळताच कळमन्याचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धडकले. त्यांनी घटनास्थळावरून पिस्तुलाच्या गोळीची एक रिकामी पुंगळी ताब्यात घेतली. आरोपींच्या शोधासाठी सर्वत्र पोलीस पथक रवाना करण्यात आले. काही वेळेतच हेमंत यादव नामक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, लांजेवारवर हल्ला झाल्याचे वृत्त कळताच भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत कळमना पोलीस ठाण्यावर धडकले. आमदार कृष्णा खोपडे, भाजयुमोचे बंटी कुकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजारे गटाविरोधात नारेबाजी करू लागले. परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळताच अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे, डीसीपी संजय दराडे, एसीपी कुमरे यांनी घटनास्थळी आणि नंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन जमावाची समजूत काढली. लांजेवारच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. लांजेवारने देगू, गोलू आणि नंदू अशी तिघांची नावे सांगितली. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
२४ तासात
दुसरा गोळीबार
गुन्हेगारांच्या वैमनस्यातून उपराजधानीत २४ तासात झालेला हा दुसरा गोळीबार आहे. मंगळवारी रात्री गिट्टीखदानमधील समाधाननगरात कुख्यात आनंद शुक्ला या गुंडावर दुसऱ्या टोळीचे कुख्यात गुंड जेन्युअल, मोगल आणि पिन्नू पांडे यांनी गोळीबार केला होता. नेम चुकल्यामुळे तो बचावला. या प्रकरणातील आरोपी फरार असून, गोळीबाराचे वृत्त ताजेच असताना आज रात्री पुन्हा कळमन्यातील गुन्हेगारांची एक टोळी दुसऱ्याच्या जीवावर उठली. २४ तासाच गोळीबाराच्या दोन घटना घडल्यामुळे पोलीसही हबकले आहेत. दुसरीकडे लांजेवार आणि हजारे गटांना भक्कम राजकीय पाठबळ असल्यामुळेही पोलीस दडपणात आले आहेत.

Web Title: Lanjevar-Hazare controversy shocked;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.