मोठ्या थकबाकीदारांनी फिरवली योजनांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:42+5:302021-06-29T04:07:42+5:30

मालमत्ता करात १० टक्के सवलतीचा २६,८९१ करदात्यांनी घेतला लाभ राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मालमत्ता कर थकबाकीदारांना ...

Large arrears turn back to plans | मोठ्या थकबाकीदारांनी फिरवली योजनांकडे पाठ

मोठ्या थकबाकीदारांनी फिरवली योजनांकडे पाठ

Next

मालमत्ता करात १० टक्के सवलतीचा २६,८९१ करदात्यांनी घेतला लाभ

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मालमत्ता कर थकबाकीदारांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपातर्फे विविध योजना राबविल्या जात आहे. परंतु त्यानंतरही थकबाकीदार पुढे येताना दिसत नाही. यात प्रामुख्याने मोठे थकबाकीदार पुढे येताना दिसत नाहीत. ३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना एकूण टॅक्सवर १० टक्के सूट दिली जात आहे. परंतु नागरिक पुढे येताना दिसत नाही. या योजनेचा २७ जूनपर्यंत फक्त २६,८९१ करदात्यांनी लाभ घेतला. तर १ एप्रिल ते २७ जूनपर्यंत एकूण ६२,२०० लोकांनी जवळपास ३२ कोटी जमा केले.

विशेष म्हणजे, डिसेंबरच्या मध्यांत दोन महिन्यासाठी अभय योजना सुरू करण्यात आली होती. त्यावेळीही मोठे थकबाकीदार पुढे आले नव्हते. १४ जूनला १० टक्के सूट देण्याचे योजना सादर करण्यात आली. योजना समाप्तीला दोन दिवस शिल्लक आहे. परंतु या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, मनपा सभागृहात २२ जूनला ३ वर्षाच्या थकीत मालमत्ता करावरील दंडाची रक्कम माफ करण्याची घोषणा करण्यात आली. कोविड संक्रमणामुळे आर्थिक संकटातील लोकांना दिलासा देण्यासाठी ही घोषणा करण्यात आली. मात्र दंड माफ करण्याचा अधिकार मनपा आयुक्तांना आहे. त्यांनी अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

शहरात जवळपास ६.५० लाख मालमत्ताधारक आहेत. परंतु अगाऊ कर भरण्याकडे लोकांचा कल दिसत नाही. गेल्या वर्षी मालमत्ता करातून २४० कोटी जमा झाले होते. तर गेल्या वर्षी २५ जूनपर्यंत मालमत्ता करातून १७.५२ कोटी जमा झाले होते. यावर्षी वसुली चांगली आहे.

.......

थकबाकीत सातत्याने वाढ

मालमत्ता कर न भरल्याने थकबाकीत सतत वाढ होत आहे. वर्ष २०१९ मध्ये ३२०.३६ कोटीची थकबाकी तर चालू डिमांड १८५.६४ कोटी होती. वर्ष २०२० मध्ये यात वाढ होऊन थकबाकी ५१४.७९ कोटी तर चालू डिमांड २३३.९८ कोटी झाली. वर्ष २०२१ मध्ये यात पुन्हा वाढ झाली व ती ६८०.३२ कोटीवर गेली. तर चालू वर्षाची डिमांड २६१.६० कोटी आहे. यावरून थकबाकीदारांमुळे मनपा आर्थिक अडचणीत असल्याचे स्पष्ट होते.

....

थकीत रक्कम थकबाकीदार

५ लाखांहून अधिक ६५९

१ ते ५ लाख २४०१

५० हजार ते १ लाख ५२२४

....

योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन दिवस : मेश्राम

राज्यात प्रथमच एखाद्या महापालिकेने मालमत्ता कर जमा करणाऱ्यांना १० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला. ३० जूनपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी दिली. मोठे थकबाकीदार कर भरण्यासाठी पुढे येत नसल्याला त्यांनी दुजोरा दिला. काही प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. थकबाकीदारांना तसेच सोडणार नाही. मालमत्ताचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Large arrears turn back to plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.