गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:23 AM2021-02-20T04:23:43+5:302021-02-20T04:23:43+5:30
नरखेड/जलालखेडा : नरखेड तालुक्यातील सिंजर, दातेवाडी, दावसा, खरबडी शिवाराला गुरवारी गारपीट आणि वादळी पावसाचा तडाखा बसला. यात शेतकऱ्यांचे मोठे ...
नरखेड/जलालखेडा : नरखेड तालुक्यातील सिंजर, दातेवाडी, दावसा, खरबडी शिवाराला गुरवारी गारपीट आणि वादळी पावसाचा तडाखा बसला. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गारपीटग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अवकाळी पावसामुळे तालुक्यात गहू, हरभऱ्याचे पीक जमिनीवर लोटले आहे. तुरीच्या शेंगा फुटून दाणे जमिनीवर पडले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक खराब झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याच बरोबर संत्रा, मोसंबी बागांनासुद्धा फटका बसला आहे. शुक्रवारी गारपीटग्रस्त भागाची तहसीलदार डी.जी. जाधव, सभापती नीलिमा रेवतकर, जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, उपसभापती वैभव दळवी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बंडोपंत उमरकर, माजी पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर, तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे, पंचायत कृषी अधिकारी चव्हाण, तलाठी, कृषी सहायकांनी पाहणी केली. या पथकाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
--
सिंजर, दातेवाडी, दावसा, खरबडीला गुरवारी झालेल्या गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. तहसीलदारांनी पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. कृषी सहायक, तलाठी व सचिव गारपी ग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करून पिकाच्या नुकसानीचे अहवाल प्रशासनाकडे सादर करतील.
डॉ. योगिराज जुमडे, कृषी अधिकारी नरखेड.
---
गारपिटीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्या भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
प्रीतम कवरे, जिल्हा परिषद सदस्य