लसीसाठी मोठी सुई ; वेस्टेजमुळे पळता भुई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:06 AM2021-09-13T04:06:52+5:302021-09-13T04:06:52+5:30
नागपूर : पूर्वी लस टोचताना मुंगी चावल्यासारखाही त्रास होत नव्हता. मात्र आता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या ‘एडी सिरिंज’चा तुटवडा पडल्याने ...
नागपूर : पूर्वी लस टोचताना मुंगी चावल्यासारखाही त्रास होत नव्हता. मात्र आता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या ‘एडी सिरिंज’चा तुटवडा पडल्याने ‘२ सीसी सिरिंज’मार्फत लस दिली जात आहे. यामुळे सुई टोचताना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शिवाय, जैविक कचऱ्याची समस्याही निर्माण झाली आहे.
नागपूर शहरात जवळपास १००वर लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड लस दिली जात आहे. जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणाला सुरुवातीला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. परंतु कोरोनाचा संसर्ग वाढून गंभीर रुग्णांची स्थिती पाहताच लसीकरणाला वेग आला. याच दरम्यान लसीचा तुटवडा पडला; परंतु मागील काही दिवसांपासून साठा उपलब्ध होऊ लागल्याने लसीकरणाला गती आली आहे. ही लस देण्यासाठी ‘एडी’ सुईचा वापर केला जात असे. ही सुई केंद्र शासनाकडून उपलब्ध होत असे; परंतु मागील दोन महिन्यांपासून सुईचा साठाच मिळाला नसल्याने स्थानिक पातळीवर ‘२ सीसी’ किंवा ‘१ सीसीची’ सुई खरेदी करून ती वापरली जात आहे. ‘२ सीसी’मुळे इंजेक्शन टोचताना त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
- काय आहे एडी, २ सीसी सिरिंज
एडी सिरिंज म्हणजे ‘ऑटो डिसेबल’ ही ०.५ मि.लि.ची सुई आहे. ही एकदा वापरली की पुन्हा वापरता येत नाही. ती आपोआपच लॉक होते. या सुईतून लस वाया जात नाही. याचा साठा उपलब्ध होत नसल्याने प्रशासन ‘२ सीसी’ सुईचा वापर करीत आहे. यामुळे डोस वाया जात आहे, डिस्पोजेबलचीही समस्या निर्माण झाली आहे.
रोज २० हजारांवर सुयांची गरज
नागपूर जिल्ह्यात रोज सरासरी १५ ते २० हजारांपर्यंत लसीकरण होत आहे. त्यामुळे २० ते २५ हजार सुयांची गरज लागते. शासनाकडून लवकरात लवकर आरोग्य विभागाकडे आणि तिथून जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेकडे त्या सुयांचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे.
स्थानिक पातळीवर सुयांची खरेदी
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या लसीचा तुटवडा पडला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर त्याची खरेदी केली जात आहे. यात ‘२ सीसी’ किंवा ‘१सीसी’ सुई खरेदी केली जात आहे. नागरिकांना ‘१ सीसी’ सुईचा त्रास होत नाही.
- डॉ. संजय चिलकर, आरोग्याधिकारी (दवाखाने), महापालिका