मोठमोठे पदाधिकारी, पण सदस्य नोंदणीत पिछाडी; जयंत पाटलांनी टोचले राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 12:12 PM2022-08-31T12:12:29+5:302022-08-31T13:38:22+5:30
काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षातून आले आहेत त्यांनी त्यांच्या जुन्या पक्षातील जास्तीत जास्त कार्यकर्ते राष्ट्रवादीशी जोडण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला.
नागपूर : राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी नागपूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. एवढे मोठे नागपूर शहर आहे. मोठमोठे नेते व पदाधिकारी आहेत; पण प्रत्यक्षात पक्षाची सदस्य नोंदणी २० हजारही झालेली नाही. हे चित्र चांगले नाही. त्यामुळे पुढील १० दिवस घराबाहेर पडा. लोकांना भेटा. मेळावे, शिबिर घ्या व किमान १० हजार क्रियाशील सदस्य व एक लाख प्राथमिक सदस्यांची नोंदणी करा, तरच नागपूरची दखल घेतली जाईल, असा सूचक इशाराही पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक गणेशपेठेतील कार्यालयात मंगळवारी झाली. तीत प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील हे सदस्य नोंदणीवरून चांगलेच आक्रमक झाले. आपल्याला भाषणबाजी करायची व ऐकायचीही नाही, असे बजावतच त्यांनी थेट सदस्य नोंदणीच्या मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले, माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह प्रदेश पदाधिकारी यांनी प्रत्येकी किमान ५ हजार प्राथमिक सदस्यांची नोंदणी करावी. युवक, विद्यार्थी, महिला सर्वच विभागांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. या नोंदणीचा पक्ष पातळीवर हिशेब ठेवला जाईल व पुढे जबाबदाऱ्या देतााच या नोंदणीचा विचार केला जाईल.
काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षातून आले आहेत त्यांनी त्यांच्या जुन्या पक्षातील जास्तीत जास्त कार्यकर्ते राष्ट्रवादीशी जोडण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. क्रियाशील सदस्यांमधूनच बूथ अध्यक्ष व बूथ प्रतिनिधी यांची निवडणूक घेतली जाईल. त्यानंतर विधानसभा पदाधिकारीसाठी निवडणूक घेतली जाईल. सप्टेंबरच्या शेवटी राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला नागपूरचे निरीक्षक माजी आ. राजू जैन, माजी मंत्री रमेश बंग, सुबोध मोहिते, माजी आ. प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे, सलील देशमुख, प्रदेश महासचिव रमन ठवकर, शेखर सावरबांधे, आभा पांडे, वेदप्रकाश आर्य, दिलीप पनकुले, सतीश इटकेलवार, अविनाश गोतमारे, प्रशांत पवार, जानबा मस्के, अनिल अहीरकर, वर्षा शामकुळे, शब्बीर अहमद विद्रोही, संतोष सिंग, शिव भेंडे, आदी उपस्थित होते.
मनपाचे तिकीट हवे असेल तर एक हजार सदस्य करा
ज्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला महापालिकेचे तिकीट हवे असेल त्याने त्याच्या प्रभागात किमान एक हजार प्राथिमक सदस्यांची नोंदणी करावी, असे टार्गेट जयंत पाटील यांनी दिले. विधानसभा लढायची असेल त्यांनी किमान ५ हजार प्राथमिक सदस्य नोंदणी करावी. निवडणुका जाहीर होतील तेव्हा होतील; पण आपण शांत बसू नका, तयारी सुरू ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला.