मेट्रो बांधणार सर्वात मोठा बॅलेन्स कॅन्टीलेव्हर ब्रीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:59 PM2019-08-03T22:59:28+5:302019-08-03T23:01:24+5:30
मेट्रो रेल्वे देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सीताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत बांधणार आहे. अशा प्रकारचा ब्रिज देशात तिसऱ्या क्रमांकाचा राहणार आहे. पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम नोव्हेंबरपासून सुरू होणार असून इंजिनिअरिंगचा एक नमुना आणि नागपूरसाठी एक लॅण्डमार्क ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वे देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सीताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत बांधणार आहे. अशा प्रकारचा ब्रिज देशात तिसऱ्या क्रमांकाचा राहणार आहे. पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम नोव्हेंबरपासून सुरू होणार असून इंजिनिअरिंगचा एक नमुना आणि नागपूरसाठी एक लॅण्डमार्क ठरणार आहे.
पत्रपरिषदेत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित म्हणाले, पूर्वी स्टील गर्डरने पुलाचे बांधकाम करण्याचा विचार केला होता. पण भविष्यात पुलाची देखभाल आणि भारतीय रेल्वेच्या विस्तारीकरणाचा विचार करून वर्षभरात पुलाचे डिझाईन अनेकदा बदलविले आहे. अखेर आधुनिक आणि अनोख्या पद्धतीने पुलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. २३१ मीटर लांबीच्या पुलाच्या भागात सिनेमाहॉल, हॉटेल्स, व्यावसायिक जागा, शाळा, निवासी कॉम्प्लेक्स आणि गर्दीने व्यापला आहे. त्यामुळे पुलाची निर्मिती करणे हे महामेट्रोपुढे एक आव्हानच आहे.
पुलाचे बांधकाम भारतीय रेल्वेच्या ट्रॅकवरून करण्यात येणार असून १०० मीटरचा एकच स्पॅन (३ मीटरचा एक गर्डर) रेल्वे ट्रॅकवरून राहणार आहे. बांधकामादरम्यान रेल्वेची वाहतूक थांबणार नाही. पुलाच्या निर्मितीनंतर मेट्रो जमिनीपासून २५ मीटर अंतरावरून धावणार आहे. अशा पुलाची निर्मिती पूर्वी दिल्ली आणि कोची मेट्रोमध्ये करण्यात आल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
दीक्षित म्हणाले, बॅलेन्स कॅन्टीलेव्हर ब्रिज हे नाव बांधकामाच्या पद्धतीमुळे देण्यात आले आहे. १०० मीटरच्या स्पॅनमध्ये खालून कोणताही आधार देण्यात येणार नाही. अखंड स्पॅनच्या एका बाजूला ७० मीटर आणि दुसºया बाजूला ६० मीटरचा पूल बांधण्यात येणार असल्यामुळे २३१ मीटरचा पूल अखंड राहील. पिलरचे बांधकाम दोन्ही बाजूला सुरू झाले आहे. पायव्याच्या मजबुतीसाठी एका ठिकणी एकत्रित १८ पिल्लर टाकण्यात आले आहेत. रेल्वे ट्रॅक जमिनीपासून ६ मीटर, त्यावर एचओई ७ मीटर आणि त्यावरून ९ मीटरपासून पुलाचे बांधकाम सुरू होणार आहे. तीन मीटर लांबीचा १४० किलो वजनाचा गर्डर पुलाच्या निर्मितीदरम्यान टाकण्यात येणार आहे. यापूर्वी मेट्रोने तीन मीटर लांबीचा ४५ किलो वजनाचा गर्डर टाकला आहे. १०० मीटरच्या स्पॅनमध्ये रेल्वेच्या ट्रॅकदरम्यानचा भाग निमुळता असल्यामुळे पुढे पुढे गर्डरचे वजन कमी होत राहील. दीक्षित म्हणाले, चार मोठ्या पिल्लरवर बॅलेन्स कॅन्टीलेव्हर लावण्यात येईल. गर्डर टाकताना पिल्लरच्या दोन्ही बाजूला ते सरकत जाईल. एकाचवेळी चार पिल्लर टाकण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी लागेल. बांधकामादरम्यान मेट्रोचा अधिकारी भारतीय रेल्वेच्या कंट्रोल रूममधून बसून चमूला निर्देश देईल. पिल्लरच्या उभारणीनंतर प्रत्यक्ष काम नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन ११ महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अनोख्या पद्धतीचे पुलाचे बांधकाम पाहण्यासाठी सर्वच इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावे, असे आवाहन दीक्षित यांनी केले.
पत्रपरिषदेत महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रिच-४) राजदीप भट्टाचार्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.