अंगणवाड्यांच्या पोषण आहारात अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:21 AM2017-10-05T01:21:01+5:302017-10-05T01:21:18+5:30
अंगणवाडी सेविका संपावर गेल्यामुळे आधीच बालकांची गैरसोय होत असताना आणखी एक संतापजनक बाब बुधवारी नागपुरात उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंगणवाडी सेविका संपावर गेल्यामुळे आधीच बालकांची गैरसोय होत असताना आणखी एक संतापजनक बाब बुधवारी नागपुरात उघडकीस आली. नंदनवन भागातील अंगणवाड्यांमध्ये बचत गटाकडून आलेल्या शेंगदाणे व गुळाच्या लाडूमध्ये अळ््या आढळून आल्या. एक-दोन नाही तर नऊ अंगणवाडी केंद्रातील पोषण आहारात हा प्रकार आढळून आल्याने तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. पोषण आहार वितरणाची जबाबदारी दिलेल्या आशा वर्करनी बाल विकास अधिकाºयांकडे याबाबत तक्रार दिली.
अंगणवाडी सेविका गेल्या काही दिवसांपासून संपावर गेल्याने बालकांची गैरसोय टाळण्यासाठी आशा वर्कर्सना पोषण आहार वितरणाची जबाबदारी दिली आहे. बचत गटाच्या माध्यमातून हा पोषण आहार पुरविला जातो. नंदनवन भागातील दर्शन कॉलनी, सद््भावनानगर आदी ठिकाणच्या केंद्रावर पोषण आहार म्हणून शेंगदाणे व गुळाचे लाडू पाठविण्यात आले होते. बुधवारी हे लाडू फोडून पाहिले असता यामध्ये चक्क जिवंत अळ््या आढळून आल्या. आशा वर्कर फुलन घुटके व शारदा घारपांडे यांनी आढळून आलेला प्रकार अतिशय संतापजनक असल्याचे सांगितले. आधी एकाच अंगणवाडीत हा अळ््यायुक्त पोषण आहार पोहचल्याची शंका होती. मात्र इतरही अंगणवाडी केंद्रावर हा प्रकार असल्याचे लक्षात आले. या भागातील केंद्र क्रमांक १०१, ११८, १२९, १२४, १३९, १४०, १००, ८७, ९५ अशा एकूण नऊ केंद्रावरील पोषण आहार वाटणाºया आशा वर्कर्सनी याबाबत तक्रार केली. फुलन घुटके यांच्या नेतृत्वात जयश्री पोटभरे, यामिनी रघुवंशी, आशा इंगोले, एस.व्ही. रामटेके आदी आशा वर्कर यांनी महानगरपालिकेच्या दर्शन कॉलनीच्या आरोग्य केंद्रावर याबाबत माहिती दिली. त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी, रेशीमबाग यांना याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्याचे घुटके यांनी सांगितले.
अंगणवाडी केंद्रावर बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार पुरविण्यात येतो. बुधवारी खिचडी आणि लाडू दिल्या गेले होते. सहसा हे लाडू न फोडताच बालकांना खायला दिले जातात. फोडून बघितल्यामुळे हा प्रकार आढळून आल्याने गरीब मुलांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळला जात असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.