उपकरणाअभावी रखडली ‘लेझर शस्त्रक्रिया’
By Admin | Published: March 6, 2016 02:58 AM2016-03-06T02:58:30+5:302016-03-06T02:58:30+5:30
चष्मा असल्याने लग्न जुळत नाही, पोलिसांत किंवा सैनिकात जाण्याची इच्छा असली तरी तिथे नोकरी मिळविण्यात अडचणी येतात.
मेडिकलचा नेत्र रोग विभाग : तीन कोटीच्या यंत्राची प्रतीक्षा
सुमेध वाघमारे नागपूर
चष्मा असल्याने लग्न जुळत नाही, पोलिसांत किंवा सैनिकात जाण्याची इच्छा असली तरी तिथे नोकरी मिळविण्यात अडचणी येतात. अशाप्रकारचे प्रश्न केवळ चष्मा असल्यामुळे अनेकांना नेहमी भेडसावत असतात. लेझर किरणांद्वारे केल्या जाणाऱ्या अतिशय सोप्या शस्त्रक्रियेमुळे चष्मा पूर्णत: निघून जातो. नागपुरात अशा शस्त्रक्रिया गेल्या पाच वर्षांपासून खासगी इस्पितळांमध्ये होतात. परंतु याचा खर्च सामान्यांच्या अवाक्याबाहेरचा आहे. मेडिकलमध्ये ही शस्त्रक्रिया स्वस्त दरात करणे शक्य आहे, परंतु येथे ‘लॅसीक लेझर’ उपकरण नाही. तीन कोटींचे हे उपकरण उपलब्ध झाल्यास उपराजधानीसोबतच विदर्भातील विशेषत: अनेक मुलींच्या रखडलेल्या शस्त्रक्रिया होऊन त्यांना नवी दृष्टी देणे शक्य आहे.
मुला-मुलीचे लग्न जुळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असते. विशेषत: मुलीच्या लग्नाच्या वेळी अनेक गोष्टी पाहिल्या जातात. त्यात जर मुलीला चष्मा लागला असेल तर अनेकदा पसंद येऊनही लग्नाला नकार दिला जातो. चष्मा असल्याने कुणीही पटकन लग्नास तयार होत नाही. याशिवाय चष्मा लागलेल्या व्यक्तींना चष्माशिवाय सर्व गोष्टी अंधूक अंधूक दिसतात. एखाद्या वेळी चष्मा कधी चुकून विसरल्यावर किंवा फुटल्यावर नवा चष्मा तयार होईपर्यंत होणारा खोळंबा हा देखील मनस्ताप देणारा ठरतो. यावर लेझर किरणांद्वारे शस्त्रक्रिया महत्त्वाची ठरते. उपराजधानीत काही मोजक्या इस्पितळांमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात येते. १८ व्या वर्षांपासून अगदी पन्नाशी पार केल्यावरही डोळ्यावर ही शस्त्रक्रिया करून चष्म्यापासून मुक्ती मिळवता येते. पाच मिनिटांच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला आयुष्यात पुढे कधीही चष्मा लावण्याची गरज पडत नाही.
याशिवाय सकाळी शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुपारी रुग्णाला रुग्णालयातून घरीही सोडण्यात येते. परंतु याचा खर्च सुमारे ४० हजारावर आहे. सर्वसामान्य रुग्णांना हा खर्च परवडण्याजोगा नाही. यामुळे अनेक रुग्ण मेडिकलच्या नेत्ररोग रुग्णालयात या शस्त्रक्रियेची विचारणा करतात. परंतु तीन कोटीचे ‘लॅसीक लेझर’ उपकरण नसल्याने रुग्णांना रिकाम्या हाती परतावे लागते. अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त डोळ्यावर उपचार करण्याची ही उपचार पद्धत राज्यात केवळ मुंबईच्या शासकीय रुग्णालय जे.जे. येथेच आहे.
सामान्यांना येथे जाणे-येणे करून उपचार घेण्याचा खर्च परवडणारा नाही. मेडिकलला हे उपकरण मिळाल्यास रुग्णालयात सुमारे दहा हजार रुपयांमध्ये दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करणे शक्य आहे.
‘लॅसिक लेझर’साठी पाठविला प्रस्ताव
मेडिकलच्या नेत्ररोग विभागाने महिनाभरापूर्वी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तीन कोटींच्या ‘लॅसीक लेझर’ उपकरणाचा प्रस्ताव अधिष्ठात्यांकडे पाठविला आहे. रक्कम मोठी असल्याने मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातल्यास याचा फायदा सामान्य रुग्णांना विशेषत: ज्यांची चष्म्यांमुळे लग्न रखडलेली आहे त्यांना होण्याची शक्यता आहे.