हृदयाच्या वाहिन्यांमधील अडथळे दूर करण्याचे लेझर तंत्रज्ञान नागपुरात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:26 AM2023-02-13T11:26:52+5:302023-02-13T11:27:37+5:30

डॉ. प्रवीण चंद्रा यांनी दिली माहिती : नव्या उपचार पद्धतीमुळे स्टेंटचीही गरज पडण्याची शक्यता कमी

Laser technology to remove blockages in heart vessels in Nagpur | हृदयाच्या वाहिन्यांमधील अडथळे दूर करण्याचे लेझर तंत्रज्ञान नागपुरात

हृदयाच्या वाहिन्यांमधील अडथळे दूर करण्याचे लेझर तंत्रज्ञान नागपुरात

googlenewsNext

नागपूर : हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी पहिल्यांदाच ‘लेझर’ तंत्रज्ञानाचा वापर व उपयोगाची माहिती प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण चंद्रा यांनी रविवारी नागपुरात दिली. या नव्या उपचार पद्धतीमुळे स्टेंटची गरज कमी पडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

‘अर्नेजा हार्ट हॉस्पिटल’, ‘कार्डिओलॉजीकल सोसायटी ऑफ इंडिया’ व ‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ विदर्भ शाखेच्या वतीने ‘टावर’ या विषयावर ‘लाइव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दिल्ली येथून डॉ. चंद्रा यांनी ‘लेझर थेरपी’ तंत्रज्ञानाची ‘लाइव्ह’ माहिती दिली. ते म्हणाले, ॲन्जिओप्लास्टी करताना ज्या हृदयाच्या धमन्यामधील अडथळे ‘बलून’चा वापरानेही दूर होत नाही अशा प्रकरणांमध्ये ‘लेझर’ तंत्रज्ञान उपयोगी ठरते. हे तंत्रज्ञान धमन्यांच्या भिंतींना धक्काही न लावता अडथळे साफ करते. कॅथेटरच्या मदतीने हे तंत्रज्ञान ‘ब्लॉकेज’पर्यंत नेले जाते. ‘लेझर’ उर्जेचा वापर ‘ब्लॉकेज’ची वाफ करण्यासाठी केला जातो. आतापर्यंत ५५ रुग्णांमध्ये ही उपचार पद्धती यशस्वी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

- ‘लेझर’मुळे धमनी आकुंचन पावण्याची जोखीम कमी

डॉ. चंद्रा म्हणाले, काहीवेळा अँजिओप्लास्टीमुळे धमनी आकुंचन पावण्याची जोखीम असते. कधीकधी ‘स्टेंट थ्रोम्बोसिस’ होऊन जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो; परंतु, ‘लेझर’ वापरल्याने ही जोखीम कमी होऊ शकते. ही उपचार पद्धती रुग्णांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरणारी आहे.

- ‘लेझर’पद्धती परिणामकारक

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा म्हणाले, विदर्भातील २०० हून अधिक डॉक्टरांना लेझर तंत्रज्ञानाविषयी पहिल्यांदाच माहिती मिळाली. ‘लेझर थेरपी’त अँजिओप्लास्टी अधिक सुलभ, परिणामकारक आणि दीर्घकाळ टिकण्याची क्षमता आहे.

- अँजिओग्राफीमध्ये इमेजिंगचा वापर

मुंबईतील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. व्ही.टी. शहा म्हणाले, हृदयरोगाच्या उपचारात नवनव्या तंत्रज्ञानाचा समावेश होत आहे. विशेषत: आता अँजिओग्राफीमध्ये हृदयातील धमन्यामधील अडथळे अधिक अचूकपणे शोधून काढण्यासाठी ‘इमेजिंग’चा वापर केला जात आहे. ज्यामुळे धमनीमधील ‘३६० डिग्री’चे चित्र मिळते. यामुळे डॉक्टरांना अडथळ्यांवर उपचार करणे व अचूक ठिकाणी स्टेट टाकणे सोपे जाते, असेही ते म्हणाले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमर आमले यांनी परिषदेचे संचालन केले.

Web Title: Laser technology to remove blockages in heart vessels in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.