गडमंदिराचा ‘वराह’ दरवाजा माेजताेय शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:01+5:302021-06-22T04:07:01+5:30

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेकच्या गडमंदिराला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले ...

The last elements of the 'Varah' door of the fort | गडमंदिराचा ‘वराह’ दरवाजा माेजताेय शेवटच्या घटका

गडमंदिराचा ‘वराह’ दरवाजा माेजताेय शेवटच्या घटका

Next

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेकच्या गडमंदिराला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हा प्राचीन ठेवा जतन करण्याची जबाबदारी शासन व प्रशासनाची असताना, या गडमंदिराच्या ‘वराह’ दरवाजाच्या देखभाल व दुरुस्तीकडे आजवर अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही प्राचीन वास्तू आता शेवटच्या घटका माेजण्याच्या मार्गावर आहे.

रामटेक शहरालगतच्या सिंदुरागिरी पर्वतावर प्रभू रामचंद्र व सीतामाईचे वास्तव्य असल्याने या ठिकाणी पुढे मंदिराची निर्मिती करण्यात आली. ‘वराह’ दरवाजामुळे या मंदिराच्या साैंदर्यात आणखी भर पडली आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी ‘वराह, शिरपूर, भैरव आणि गाेकुल’ असे एकूण चार दरवाजे आहेत. या चारही दरवाजांच्या निर्मितीची स्थापत्य कला व त्यावरील कलाकुसर ही प्राचीन आहे.

या दरवाजांच्या बांधकामासाठी विशेषत: दगड, विटा व चुन्याचा वापर करण्यात आला आहे. या दरवाजांना माेठमाेठे लाकडी द्वार लावले आहेत. काळाच्या ओघात तसेच देखभाल व दुरुस्तीच्या अभावाने ते माेडकळीस आले असले तरी, त्यांचा वापर आजही अविरतपणे सुरूच आहे. अलीकडच्या काळात या दरवाजांची दयनीय अवस्था बनली आहे. पावसामुळे ते खिळखिळे झाले आहेत.

या मंदिराची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्तीदरम्यान वास्तूंचे पुरातत्व कायम ठेवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. परंंतु, दरवाजाच्या दुरुस्तीकडे लक्षच देण्यात आले नाही. प्रत्येक पंचवार्षिकमध्ये या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार केला जाताे. अलीकडच्या काळात १५० काेटी रुपयांच्या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, आराखड्यातील निधीच्या तुलनेत देखभाल, दुरुस्ती व विकासाची कामे हाेताना दिसून येत नाहीत. ‘वराह’ दरवाजा या प्राचीन वास्तूचे जतन करण्यासाठी त्याची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे.

...

मूर्तींची प्रतिष्ठापना

रामटेक शहरालगतच्या पर्वतावर भाेसलेकालीन (नागपूरकर भाेसले) गढी आहे. या भागाचा कारभार पाहण्यासाठी या गढीची निर्मिती करण्यात आली असावी. जवळच सूर नदी वाहते. या नदीच्या पात्रात काही वर्षापूर्वी करण्यात आलेल्या खाेदकामात प्रभू रामचंद्रांची तसेच इतर देवादिकांची मूर्ती आढळून आली. या सर्व मूर्तींंची गडमंदिरावर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

...

मंदिर व्यवस्थापन ट्रस्ट

या गडमंदिराचा संपूर्ण कारभार ट्रस्टमार्फत चालविला जाताे. ट्रस्टींमध्ये उद्भवलेला वाद न्यायालयात गेला आणि न्यायालयाच्या आदेशान्वये ही जबाबदारी रामटेक येथील उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे आली. त्यामुळे सध्या उपविभागीय अधिकारी जाेगेंद्र कट्यारे या मंदिराचा कारभार सांभाळत आहेत. परिसरातील इतर मंदिरांची जबाबदारी ही पुरातत्त्व विभागाकडे आहे.

Web Title: The last elements of the 'Varah' door of the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.