राज्यात मागील पाच वर्षात वन्यप्राण्यांनी घेतले २१७ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 07:23 PM2018-01-08T19:23:29+5:302018-01-08T19:26:22+5:30
गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. मागील पाच वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला, किती जखमी झाले, पीडित किंवा त्यांच्या नातेवार्इंकांना किती नुकसानभरपाई देण्यात आली, पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१३ सालापासून ते डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१७ नागरिकांचा बळी गेला तर २ हजार १७६ नागरिक जखमी झाले. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईपोटी १४ कोटी ८ लाख रुपयांची मदत करण्यात आली. तर जखमींना ८ कोटी २४ लाख ५५ हजार रुपये देण्यात आले. सरासरी एका मृताच्या कुटुंबीयांना ६ लाख ४८ हजार ८४७ रुपयांची तर प्रत्येक जखमीला ३७ हजार ८९२ रुपयांची मदत मिळाली.
पिकांच्या नुकसानीची लाखांहून अधिक प्रकरणे
वन्यप्राण्यांनी शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करण्याचे प्रकारदेखील होताना दिसून येतात. गेल्या पाच वर्षांत अशाप्रकारे नुकसान झालेली १ लाख १४ हजार ३६३ प्रकरणे नोंदविण्यात आली. नुकसानभरपाईपोटी संबंधित शेतकऱ्यांना ४३ कोटी १४ लाख ९२ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
३० हजार पाळीव प्राणी भक्ष्यस्थानी
एप्रिल २०१३ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ३० हजार ६२५ पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. मरण पावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई म्हणून १६ कोटी २५ लाख १६ हजार रुपयांची मदत करण्यात आली. तर ८३६ पाळीव जनावरे जखमी झाली व त्यांच्या मालकांना ९ लाख ४ हजारांची मदत देण्यात आली.
वर्षनिहाय नागरिकांचे मृत्यू व जखमी
वर्ष मृत्यू जखमी
२०१३ ४६ ३९७
२०१४ ३८ ४७१
२०१५ ३९ ४८७
२०१६ ५२ ६७४
२०१७ ४२ १४७