चार महिन्यात पेट्रोल ८.३९, डिझेल ६.७२, तर सिलिंडर १२५ रुपयांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 03:12 PM2021-02-09T15:12:46+5:302021-02-09T15:13:55+5:30
Nagpur News महागाई कमी करण्याची त्यांची सततची मागणी आहे. आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे महागाई आणखी किती रडविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दररोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने गरीब आणि सामान्यांच्या नाकीनऊ आले आहे. त्यातच भर म्हणून गॅस सिलिंडरच्या किमतीत दर महिन्यात वाढ होत असल्याचे गरीब आणि सामान्यांचे महिन्यांचे बजेट कोसळले आहे. महागाई कमी करण्याची त्यांची सततची मागणी आहे. आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे महागाई आणखी किती रडविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
१ नोव्हेंबर २०२० ते १ फेब्रुवारी २०२० या चार महिन्यात पेट्रोल प्रति लिटर ८.३९ रुपये आणि डिझेल ६.८२ रुपये तर घरगुती गॅस सिलिंडर १२५ रुपयांनी महाग झाले आहे. आवश्यक वस्तूंच्या किमतीत निरंतर वाढ होत असल्याने गरीबापासून श्रीमंतापर्यंत सर्वजण त्रस्त आहेत.
केंद्र सरकारने तेल कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढविण्याची मुभा दिल्याने किंमत दररोज वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत ६० डॉलर प्रति बॅरल आहे. त्यानुसार देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे ४५ रुपये आणि ३५ रुपयांदरम्यान असायला हवी. पण केंद्र आणि राज्य सरकारच्या भरमसाठ करांमुळे मंगळवारी पेट्रोल प्रति लिटर ९४.३१ आणि डिझेल ८४.८९ रुपयांवर पोहोचले आहे. दररोजच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता आहे. याशिवाय गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ होऊन ७७१ रुपयांवर भाव गेले आहेत. एकीकडे भाव वाढवायचे आणि दुसरीकडे सबसिडी कपात करण्याचे सरकारचे षडयंत्र आहे. नोव्हेंबर महिन्यात गॅसची सिलिंडरची किंमत ६४६ रुपये असताना ग्राहकाच्या बँक खात्यात ४०.१० रुपये सबसिडी जमा व्हायची आणि आता फेब्रुवारीमध्ये किंमत ७७१ रुपयांवर गेल्यानंतरही खात्यात ४०.१० रुपयेच सबसिडी जमा होत आहे. ग्राहकांना पुढे बाजारभावानुसार गॅस सिलिंडर विकत घ्यावे लागेल, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे केंद्र सरकारने इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्यासाठी देशभर मोहीम सुरू केली आहे. या कार महाग असल्याने लोकांची पसंती अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या कारला आहे. तर दुसरीकडे कंपनीत कारमध्ये गॅस किट लागलेल्या कारला आता मागणी वाढली आहे. यानुसार सीएनजी, एलपीजी गॅस आणि पेट्रोलच्या किमतीत जवळपास ४० रुपयांची तफावत आहे. यामुळे गॅस किट फिटेड कारची विक्री वाढल्याचे डीलर्सनी सांगितले.
दरवाढीमुळे त्रस्त
डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्याने मालवाहतूक वाढली आहे. त्याचा परिणाम महागाईवर होत आहे. अशीच वाढ होत राहिली तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही निरंतर वाढ होत राहील. आधीच कोरोनाने त्रस्त लोकांचे वाढत्या महागाईत जगणे कठीण होणार आहे. कर कमी करून भाव नियंत्रणात आणावे.
फारूख अकबानी, व्यावसायिक.
कर कमी करावे
सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील थोडेफार कर कमी केल्यास भाव कमी होतील आणि गरीब व सामान्यांना दिलासा मिळेल. हीच बाब गॅस सिलिंडरसाठीही लागू होते. सरकार विकासाच्या नावाखाली कररूपी वाढ करून लोकांच्या खिशातून अनावश्यक पैसे काढीत आहे. या सर्व वस्तू जीएसटीच्या टप्प्यात आणा.
सीए कैलास जोगानी, व्यावसायिक.
सामान्यांचा छळ बंद करा
पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमती वाढवून सरकारने चालविलेला गरीब व सामान्यांचा छळ आता बंद करावा. दरवाढीची विविध कारणे देऊन सरकार करवाढ करून लोकांना त्रास देत आहे. कोरोनाने लोकांच्या पगारात कपात होत असताना अनावश्यक कर वाढविल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडले आहे.
ममता वैरागडे, गृहिणी.