अखेर चणा खरेदीचा मुहूर्त सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:50+5:302021-06-10T04:07:50+5:30
नरखेड : नरखेड तालुक्यातील ४८० शेतकऱ्यांच्या चणा खरेदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गत वर्षीच्या ...
नरखेड : नरखेड तालुक्यातील ४८० शेतकऱ्यांच्या चणा खरेदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गत वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक गेले होते. त्यानंतर रबी हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी गव्हाबरोबरच चण्याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. पोषक वातावरणामुळे तालुक्यात चण्याचे उत्पादन चांगले झाले. त्यासाठी नाफेडने ५,१०० रुपये प्रती क्विंटल भाव जाहीर करून शेतकऱ्यांना चणा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी असे सांगितले होते. त्यानुसार ४८० शेतकऱ्यांनी ४०० मे. टन चणा विक्रीसाठी मार्च महिन्यात नोंदणी केली होती. मात्र नाफेडने तालुका खरेदी-विक्री संस्थेला कोणती सूचना न देता २२ मे रोजी चणा उत्पादकांना मोबाईलवर संदेश पाठवून चणा विक्रीसाठी आणावा, असे कळविले. यासाठी केवळ तीन दिवसाची मुदत देण्यात आली होती. या तीन दिवसात संपूर्ण तालुक्यातील चणा खरेदी करणे अशक्य होते. त्याकरिता मुदत वाढ द्यावी, बारदाना उपलब्ध करून द्यावा, अशा आशयाचे पत्र नाफेडच्या व्यवस्थापकांना सभापती लीलाधर ठाकरे यांनी दिले होते. मात्र पावसाळा सुरू झाला तरी चणा खरेदीची प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकरीही चिंतित होता. काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बी-बियाण्याचे नियोजन करण्यासाठी चणा विकण्याचे ठरविले होते. खाजगी व्यापारी ५४०० ते ५६०० रु. प्रती क्विंटल भाव देत चण्याची खरेदी करीत होते. मात्र काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत व्यापाऱ्यांनी चण्याचे प्रती क्विंटल भाव ४७०० रुपयावर आणले. त्यामुळे नुकसान होण्यापेक्षा ५१०० रुपये क्विंटल दराने नाफेडलाच चणा विकू या आशेत शेतकरी होते. शेवटी तालुक्यात चणा खरेदीस सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी काटापूजन करून चणा खरेदीची सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे, उपसभापती घनश्याम फुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बबन लोहे, सदस्य अमोल आरघोडे, व्यवस्थापक हरिभाऊ ठाकरे, सचिव सतीश येवले, ग्रेडर विनोद भिसे याची उपस्थिती होती.