रात्री केली चोरी, सकाळी पोहचले जीममध्ये
By admin | Published: May 8, 2016 03:17 AM2016-05-08T03:17:40+5:302016-05-08T03:17:40+5:30
कळमना, पारडी येथील भवानीनगरातील बालाजी मोबाईल शॉपीमधून शुक्रवारी रात्री उशिरा दोन युवकांनी लाखोंचे मोबाईल, हेडफोन, परफ्युम, गॉगल उडवले.
शोरूममधून चोरले लाखोंचे मोबाईल : एका आरोपीला अटक
नागपूर : कळमना, पारडी येथील भवानीनगरातील बालाजी मोबाईल शॉपीमधून शुक्रवारी रात्री उशिरा दोन युवकांनी लाखोंचे मोबाईल, हेडफोन, परफ्युम, गॉगल उडवले. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. चोरी करणारे युवक तोंडावर कापड बांधून दुकानात शिरले होते. एवढेच नव्हे तर चोरी केल्यानंतर आरोपी सकाळी ६.३० वाजता शोरूम मालकाच्या जीममध्ये व्यायाम करण्यासाठी देखील गेले. आरोपींमध्ये अभिनिल व त्याचा सहकारी सूरज याचा समावेश आहे.
बालाजी मोबाईलचे संचालक प्रवीण मिश्रा यांच्या मोबाईलच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर ‘एक्सरसाइज डॉट कॉम’ नावाची जीम आहे. संबंधित आरोपी दररोज या जीममध्ये व्यायाम करायला यायचे. नेहमीप्रमाणे प्रवीण हे शुक्रवारी रात्री ११ वाजता मोबाईल शॉप बंद करून घरी गेले. यानंतर आरोपींनी रात्री १ वाजता दुकानाच्या मागच्या खिडकीत लागलेले कुलर डक्टींग काढून दुकानात प्रवेश केला. नामवंत कंपन्यांचे ४० ते ५० मोबाईल व अन्य सामान घेऊन पसार झाले. चोरी केल्यानंतर आरोपी सकाळी ६.३० वाजता जीममध्येही गेले. तेथे प्रशिक्षक अभिषेक यांना खालच्या शोरूममधील कुलर पाहून संशय आला. त्यांनी आरोपी युवकालाच दुकानात काय झाले ते पहायला पाठविले. अभिनिलने परत येऊन दुकानाच्या आतील सामान अस्ताव्यस्त पडून असल्याचे सांगत चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला.
हे ऐकताच प्रशिक्षक अभिषेक यांनी तत्काळ जीम व मोबाईल शॉपीचे मालक प्रवीण यांना माहिती दिली. प्रवीण यांनी दुकानात पोहचून चोरी गेलेल्या सामानाचा अंदाज घेतला व कळमना पोलिसांना कळविले. (प्रतिनिधी)
कपडे लपविताना दिसले आरोपी
दुकानातील चोरीबाबत पोलीस चौकशी करीत असतानाच दुकान मालकाला त्यांच मित्र रोशन गेडाम याचा फोन आला. रोशनने सांगितले की, भरतवाडा ते कामठी रोड दरम्यान आरोपी युवक त्यांच्या दुकानातील कपडे व सामान घेऊन जाताना दिसले. रोशन यांनी लगेच आपल्या काही सहकाऱ्यांसह आरोपींचा पाठलाग केला. आरोपी नाल्याजवळ कपडे, मोबाईल व अन्य सामान खड्ड्यात लपवित होते. रोशन व सहकाऱ्यांनी त्यांना घेरले. या वेळी अभिनिल पळण्यात यशस्वी झाला तर सूरज सापडला. माहिती मिळताच प्रवीणही जीमच्या अन्य लोकांसोबत घटनास्थळी पोहचला. सुरजजवळ ३५ मोबाईल सापडले. अन्य सामान घेऊन अभिनिल फरार झाला आहे.