अंत्यसंस्काराला आलेल्या तरुणीने घेतला अखेरचा निरोप

By admin | Published: June 22, 2016 02:51 AM2016-06-22T02:51:36+5:302016-06-22T02:51:36+5:30

नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या चौघींना कुलरचा जोरदार करंट लागला. त्यामुळे एका तरुणीचा मृत्यू झाला तर, तीन जणी गंभीर जखमी झाल्या.

Last sentencing took place with the last woman | अंत्यसंस्काराला आलेल्या तरुणीने घेतला अखेरचा निरोप

अंत्यसंस्काराला आलेल्या तरुणीने घेतला अखेरचा निरोप

Next

चौघींना लागला कुलरचा करंट : एकीचा मृत्यू , तिघी जखमी, सिद्धार्थनगरात शोककळा
नागपूर : नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या चौघींना कुलरचा जोरदार करंट लागला. त्यामुळे एका तरुणीचा मृत्यू झाला तर, तीन जणी गंभीर जखमी झाल्या. त्यातील एकीची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास सिद्धार्थनगर टेका परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. प्रणिता विवेक गणवीर (वय २३) असे मृत तरुणीचे नाव आहे.
सिद्धार्थनगर टेका नाका परिसरातील रमेश जांभूळकर यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि परिसरातील मंडळी जमली. याच भागात राहणारे विवेक गणवीर यांचा परिवारसुद्धा जांभूळकर यांच्या घरी पोहचला.
अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना घरात बसलेल्या महिलांमधील एका छोट्या मुलाची चप्पल चुकीने कुलरखाली गेली. ती काढण्यासाठी शालिनी वीरेंद्र अंबादे (वय २५) या महिलेने कुलरखाली हात घातला. जोरदार करंट लागल्याने तिने झटक्यात हात मागे ओढला. त्यामुळे कुलर एका बाजूला कलंडला. सुरू असलेला कुलर खाली पडू नये म्हणून सायली प्रवीण साखरे (वय २५) आणि वर्षा अजय इंदूरकर (वय ४०) या दोघींनी तो सावरला. मात्र, त्यांनाही जोरदार करंट लागला. तेवढ्यातच बाजूला उभ्या असलेल्या प्रणिताने दोन्ही हाताने कुलर पकडला. त्यामुळे तिलाही जोरदार करंट लागला. चौघींना करंट लागल्याचे लक्षात आल्याने तेथे एकच धावपळ झाली. चौघींनाही बाजूच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रणिताची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मेयोत हलविण्यात आले.
तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शालिनी, सायली आणि वर्षा यांच्यावर उपचार सुरू असून, शालिनीची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)

एमबीएची होती विद्यार्थिनी
मृत प्रणिता एनआयटी कॉलेजची एमबीएच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. हुशार अन् चुणचुणीत असलेल्या प्रणिताच्या मृत्यूने तिच्या परिवाराला जबर मानसिक धक्का बसला आहे. प्रणिताचे वडील विवेक गणवीर केरोसिनचा व्यवसाय करतात. प्रणिताला मोठी बहीण मोना आणि लहान भाऊ मयूर आहे. गणवीर आणि जांभूळकर यांच्यात पारिवारिक संबंध आहे. सूत्रांनुसार, प्रणिता जांभूळकरांना काका म्हणायची. काकांच्या अंत्ययात्रेला आलेली प्रणिता तेथूनच सर्वांचा अखेरचा निरोप घेईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.

 

Web Title: Last sentencing took place with the last woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.