२६ डिसेंबरला दिसणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 08:05 PM2019-11-30T20:05:05+5:302019-11-30T20:08:05+5:30

यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २६ डिसेंबरला दिसणार आहे. दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील काही शहरातून दुर्मिळ असे कंकणाकृती तर विदर्भ, महाराष्ट्रासह उर्वरित भारतातून ते खंडग्रास दिसेल.

The last solar eclipse of the year will be seen on December 26th | २६ डिसेंबरला दिसणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 

२६ डिसेंबरला दिसणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्रात खंडग्रास : दक्षिण भारतातून दुर्मिळ कंकणाकृती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २६ डिसेंबरला दिसणार आहे. दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील काही शहरातून दुर्मिळ असे कंकणाकृती तर विदर्भ, महाराष्ट्रासह उर्वरित भारतातून ते खंडग्रास दिसेल.
कंकणाकृती सूर्यग्रहण दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणाऱ्या खग्रास ग्रहणवेळी पृथ्वी चंद्राचे अंतर कमी असते. चंद्र, सूर्याचे बिंब सारखेच दिसते. त्यामुळे सूर्यबिंब चंद्रबिंबाने झाकले जाते. परंतु कंकणाकृती ग्रहणावेळी चंद्र आणि पृथ्वीचे अंतर जास्त असते. या घटनेत सूर्यबिंब मोठे आणि चंद्रबिंब लहान असते. चंद्रामुळे सूर्यबिंब पूर्ण झाकले जात नाही. त्यामुळे कंकणासारखी प्रकाशाची कडा दिसते. त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. ग्रहणवेळी चंद्राची गडद सावली केवळ ११८ किलोमीटरच्या रुंद पट्ट्यातून जात असल्याने त्याच प्रदेशातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल.

येथे दिसेल सूर्यग्रहण
कंकणाकृती ग्रहणाची सुरवात कतार, सौदी अरेबिया, ओमान, भारत, सिंगापूर, मलेशिया, फिलिप्पीन, श्रीलंका, इंडोनेशिया या देशातील काही भागातून दिसेल. दक्षिण भारतात केरळमधील (कन्नूर, कसारगोड, थालसरी, पलक्कड), कर्नाटकातील (मंगलोर, म्हैसूर), तामिळनाडूतील (कोईमतूर, इरोडे, करूर, दिंडीगुल, कोझीकोडे, उतकमंड, शिवगंगा, तिरुचिरापल्ली, पुडकोट्टाई) येथून कंकणाकृती दिसेल. महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून ६० ते ७० टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.
खंडग्रास ग्रहणाची सुरुवात २६ डिसेंबरला सकाळी ७.५९.५३ वाजता होईल. खग्रास ग्रहणाची सुरवात ९.०४.३३, खग्रास ग्रहण मध्य १०.४७.४६, खग्रास ग्रहणाचा शेवट १२.३०.५५, खंडग्रास ग्राहणाचा शेवट ०१.३५.४० वाजता होईल. विदर्भ, महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी ८.१० वाजेपासून दिसेल. ९.३२ वाजता ग्रहण मध्य असेल तर ११ वाजता ग्रहण समाप्ती होईल.

कुठल्याही अंधश्रद्धा न बाळगता, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून सूर्यग्रहण पाहावे. मात्र सूर्यग्रहण साध्या डोळ्याने पाहू नये. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे डोळे खराब होतात किंवा अंधत्व येऊ शकते.
 प्रा सुरेश चोपणे, सदस्य सायन्स नासा.

Web Title: The last solar eclipse of the year will be seen on December 26th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.