सप्टेबरच्या अंतिम आठवड्यात नागपुरात संक्रमितांसह मृत्यूदरही घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 10:48 AM2020-10-05T10:48:42+5:302020-10-05T10:50:49+5:30
Corona, Nagpur News नागपुरात १३ ते १९ सप्टेंबरच्या दरम्यान १२ हजार ४०३ संक्रमित आढळले होते. या तुलनेत २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या काळात ६ हजार ६१३ संक्रमित आढळले तर, मृत्यूसंख्या २३९ पर्यंत खालावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सप्टेबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कोरोनाच्या संक्रमितांची आणि मृतांची संख्या बरीच घटल्याचे दिसत आहे. १३ ते १९ सप्टेंबरच्या दरम्यान १२ हजार ४०३ संक्रमित आढळले होते. तर ३५८ जणांचा मृत्यू झाला होता. या तुलनेत २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या काळात ६ हजार ६१३ संक्रमित आढळले तर, मृत्यूसंख्या २३९ पर्यंत खालावली. यावरून संक्रमित निम्म्यावर आल्याचे स्पष्ट होत आहे.
नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्चला आढळला. मार्च महिन्यात १६ रुग्ण आढळले. तर एप्रिल महिन्यात ही संख्या १२२ वर पोहचून रुग्णांचा एकूण आकडा १३८ वर पोहचला होता. दोघांचा मृत्यू झाला होता. मे महिन्यात ४०३ रुग्ण आढळले. त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला. यानंतर रूग्ण आणि मृत्यूसंख्येत वाढच होत गेली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाने कहरच केला. ऑगस्ट महिन्यात २४ हजार १६३ नवे रुग्ण आढळले. यातील ९१९ जणांचा मृत्यू झाला. तर सप्टेंबर महिन्यात ४८ हजार ४५७ रुग्ण आढळले. या महिन्यात मृत्यूसंख्या १ हजार ४६५ झाली होती.
सप्टेंबरमध्ये चढउतार
सप्टेंबर महिन्यात ६ ते १२ या तारखेदरम्यान ११ हजार ९८९ रुग्ण आढळले, तर मृत्यूसंख्या ३४९ होती. १३ ते १९ तारखेदरम्यान १२ हजार ४०३ संक्रमित आढळले तर ३५८ जणांचा मृत्यू झाला. २० ते २६ या तारखेदरम्यान ८ हजार ४४२ संक्रमित सापडले. या वेळी मृत्यूसंख्या ३३० होती. तर २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या काळात संक्रमितांची संख्या ६ हजार ६१३ पर्यंत घसरली, मृत्यूसंख्याही २३९ पर्यंत आली.