उपराजधानीत वर्षभरात सहा हृदयांना मिळाले नाहीत रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:02 PM2018-11-21T13:02:11+5:302018-11-21T13:03:28+5:30
देशात दरवर्षी ५० हजार हृदय प्रत्यारोपणाची गरज पडते, परंतु त्या तुलनेत ‘ब्रेन डेड’ दात्याकडून केवळ १० ते १५ हृदय मिळतात. नागपुरात या वर्षात आतापर्यंत ‘ब्रेन डेड’ दात्यांकडून नऊ हृदय प्राप्त झाले परंतु दोन हृदय चेन्नई तर एक हृदय मुंबईला पोहचू शकले.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात दरवर्षी ५० हजार हृदय प्रत्यारोपणाची गरज पडते, परंतु त्या तुलनेत ‘ब्रेन डेड’ दात्याकडून केवळ १० ते १५ हृदय मिळतात. नागपुरात या वर्षात आतापर्यंत ‘ब्रेन डेड’ दात्यांकडून नऊ हृदय प्राप्त झाले परंतु दोन हृदय चेन्नई तर एक हृदय मुंबईला पोहचू शकले. उर्वरीत सहा हृदय विमानसेवेसह इतरही सेवा तातडीने उपलब्ध होऊ न शकल्याने वाया गेले. सार्वजनिक आरोग्य विभागाने नागपूरच्या एका खासगी हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपणाची मंजुरी दिली आहे. परंतु गरजु रुग्ण विदर्भाच्या बाहेर जाऊन नोंदणी करीत असल्याने अवयव असून त्याचा उपयोग होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे, सोमवारी अपघातात जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या सूरज दूधपचारे या अवयव दात्याच्या हृदयालाही रुग्ण मिळाला नसल्याने ते मातीमोल झाले.अवयवदान एक आशेचा किरण आहे. एक ‘मेंदू मृत’ अवयवदाता सात जणांना जीवनदान देतो तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. एका मृतदेहामुळे सुमारे ४२ लोकांना आपले आयुष्य पूर्ववत जगण्यास मदत होते. परंतु आजही हव्या त्या प्रमाणात अवयवदान होत नाही. हजारो रुग्ण आज नाही तर उद्या अवयव मिळेल, या आशेने मृत्यूशी झुंज देत आहेत. एका अभ्यासानुसार अवयवाच्या विकाराने किंवा निकामी झाल्याने भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. उपराजधानीत अवयवदानाला चांगले दिवस येऊ पाहत आहे. आता नागपुरात केवळ मूत्रपिंड प्रत्यारोपणच नाही तर यकृत प्रत्यारोपणालाही सुरुवात झाली आहे. हृदय प्रत्यारोपणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपणाची मंजुरी दिली आहे. कौशल्यप्राप्त डॉक्टर, तज्ज्ञ मनुष्यबळ व आवश्यक सोयींना घेऊन ही परवानगी मिळाली आहे. राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादनंतर नागपूर हे चौथे केंद्र ठरले आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यात एका रुग्णानेही हृदय प्रत्यारोपणाची नोंदणी केली नाही. विदर्भातील रुग्ण पुणे, मुंबई, औरंगाबाद, चेन्नई व दिल्ली येथे नोंदणी करीत असल्याने येथील रुग्णांचे हृदय, फुफ्फुस बाहेर जात आहे. यातही वेळेवर विमानसेवा, हवामानाची साथ व रुग्णाची उपलब्धतानंतरच रुग्णापर्यंत अवयव पोहचत असल्याने आतापर्यंत तीनच हृदय विदर्भाबाहेर पोहचू शकले.
चेन्नईला दोन तर मुंबईला एक हृदय गेले
४जानेवारी २०१८ ते आतापर्यंत ११ मेंदू मृत (ब्रेन डेड) रुग्णांकडून प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या (झेडटीसीसी) पुढाकारामुळे २० मूत्रपिंड, ११ यकृत, तीन हृदय, एक फुफ्फुस, १६ बुबूळ व दोन दात्याकडून त्वचा मिळाली. यात ‘नोटो’च्या मदतीने केवळ दोन हृदय चेन्नई तर एक हृदय ‘रोटो’च्या मदतीने मुंबई येथील रुग्णाला मिळाले. सहा हृदय उपलब्ध झाले असताना रुग्णाअभावी ते मातीमोल झाले.
रुग्णांनी विश्वास दाखवायला हवा
एकीकडे अवयव मिळत नसल्याने रुग्ण मृत्यूशी लढा देत आहे, दुसरीकडे अवयव असताना रुग्ण मिळत नसल्याची शोकांतिका आहे. नागपुरात तज्ज्ञ व कौशल्यप्राप्त डॉक्टर, अनुभवी मनुष्यबळ आणि आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध असल्यामुळेच आरोग्य विभागाने हृदय प्रत्यारोपणाला मंजुरी दिली आहे. रुग्णांनी येथेही नोंदणी करून विश्वास दाखवायला हवा. यामुळे हृदयासारखे महत्त्वाचे अवयव मातीमोल होणार नाही.
-डॉ. रवी वानखेडे
सचिव, झेडटीसीसी नागपूर