कुख्यात मंजित वाडेचे अखेर आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 07:46 PM2019-06-21T19:46:18+5:302019-06-21T19:48:49+5:30
उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार मंजित वाडे याने शुक्रवारी, २१ जूनला पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मंजितच्या आत्मसमर्पण नाट्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार मंजित वाडे याने शुक्रवारी, २१ जूनला पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मंजितच्या आत्मसमर्पण नाट्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
गुरुवारी २५ एप्रिलच्या मध्यरात्री आरोपी लिटिल सरदार, मंजित वाडे आणि साथीदारांनी बॉबी माकन यांचे अपहरण केले होते. त्यांना पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये बसवल्यानंतर त्यांची कार बेवारस अवस्थेत घरापासून काही अंतरावर सोडून दिली. मध्यरात्री बॉबीच्या मोबाईलवर त्यांच्या नातेवाईकांनी फोन केले. मात्र, १२ वाजून ५२ मिनिटानंतर त्यांचे तिन्ही फोन बंद होते. त्यामुळे २६ एप्रिलच्या दुपारी बॉबीच्या पत्नीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली होती. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. तातडीने शोधाशोध करण्याऐवजी मिसिंगची नोंद घेत गप्प बसणे पसंत केले. दरम्यान, २८ एप्रिलला बॉबीचा मृतदेह कोंढाळीजवळ सापडला. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. जरीपटका पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर अपहरणकर्त्यांचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या डझनभर पथकांना तब्बल आठ दिवस धावपळ करावी लागली होती. बॉबीचे अपहरण आणि हत्या करण्यासाठी ज्या इनोव्हा कारचा वापर झाला. त्या कारचा छडा लागल्यानंतर ३ मे रोजी कारचालक हनी चंडोकला मुंबईत जाऊन गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत आरोपींची नावे सांगितली. त्यानुसार गुन्हे शाखेने कुख्यात गुंड लिटिल सरदार ऊर्फ शैलेंद्रसिंग गुरुचरणसिंग लोहिया (वय ४३, रा. अशोकनगर), त्याचा बॉडीगार्ड सिटू ऊर्फ हरजितसिंग गुरुबचनसिंग गौर (वय २८, रा. बिनाकी मंगळवारी), बाबू ऊर्फ गुरुमितसिंग बचनसिंग खोकर (वय ५६, रा.पाचपावली) आणि हनी ऊर्फ मनिंदरसिंग हरजिंदरसिंग चंडोक (वय ४४, रा. जरीपटका) या चौघांना अटक केली. दोन दिवसांनंतर परमजितसिंग ऊर्फ बिट्टू भाटिया या आरोपीला पुरावा नष्ट करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली. मात्र, या प्रकरणाचा मुख्य आरोपी कुख्यात गुंड मंजित वाडे (वय ५५) फरार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी पंजाब, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा येथे पोलिसांची पथके जाऊन परत आली. कुख्यात मंजितची अटक शहर पोलीस दलासाठी प्रतिष्ठेचा विषय ठरली होती. त्यासंबंधाने प्रयत्न सुरू असताना शुक्रवारी पोलिसांसमोर मंजितने आत्मसमर्पण केले. मंजितच्या आत्मसमर्पण नाट्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाणआले आहे.