अनोळखी रुग्णाला लाभली ओळख : नागपूरच्या मेडिकलमध्ये अडीच महिने उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:31 PM2018-02-20T23:31:27+5:302018-02-20T23:32:50+5:30
समाजसेवा अधीक्षक त्यांचे नातेवाईक झाले. उपचाराला सुरुवात झाली. अधीक्षकांनी त्यांच्या कपड्यापासून ते औषधांपर्यंतची सोय केली. अडीच महिन्याच्या उपचारानंतर रुग्णाला स्वत:ची ओळख पटू लागली. अधीक्षकांनी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर शोध सुरू केला आणि अनोळखी रुग्ण ओळखीचा झाला. आता लवकरच त्यांची आप्तांशी भेट होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने एका अज्ञात रुग्णाला मेडिकलमध्ये आणून सोडले. गंभीर अवस्थेमुळे ओळख पटविणे अशक्य झाले होते. रुग्णाजवळ कोणी नव्हते. समाजसेवा अधीक्षक त्यांचे नातेवाईक झाले. उपचाराला सुरुवात झाली. अधीक्षकांनी त्यांच्या कपड्यापासून ते औषधांपर्यंतची सोय केली. अडीच महिन्याच्या उपचारानंतर रुग्णाला स्वत:ची ओळख पटू लागली. अधीक्षकांनी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर शोध सुरू केला आणि अनोळखी रुग्ण ओळखीचा झाला. आता लवकरच त्यांची आप्तांशी भेट होणार आहे.
अविनाश रहांगडाले (५५) (नाव बदलले आहे) रा. यवतमाळ असे अनोळखी रुग्णाचे नाव. प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ येथे गाई चारण्यावरून रहांगडाले व एका अज्ञात व्यक्तीमध्ये ५ डिसेंबर २०१७ रोजी कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात अनोळखी इसमाने रहांगडालेंना प्रचंड मारहाण केली. बेशुद्ध अवस्थेत रहांगडाले यांना घटनास्थळीच सोडून आरोपी पळून गेला. जागरूक नागरिकाने ‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला याची माहिती दिली. रुग्णवाहिकेने नागपुरातील मेडिकल रुग्णालयात त्यांना आणून सोडले. त्यावेळी त्यांच्यासोबत कुणीच नव्हते. मेडिकलमधील समाजसेवा अधीक्षकच रहांगडाले यांचे नातेवाईक म्हणून समोर आले. त्यांनीच रहांगडाले यांना वॉर्ड क्र. १ मध्ये भरती केले आणि उपचारही सुरू केले. त्यांना कपड्यांपासून ते औषधे व जेवणाचीही सोय करून दिली. समाजसेवा अधीक्षकांनी रहांगडाले यांना उपचारादरम्यान पत्ता विचारण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, रहांगडाले यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रतिसाद देत नव्हते तरीही अधीक्षकांचे प्रयत्न सुरूच होते. मागील अडीच महिन्यांच्या उपचारानंतर गेल्या तीन दिवसांपासूर्वी रहांगडाले यांनी यवतमाळचे रहिवासी असल्याची पुसटशी ओळख दिली. अधीक्षकांनी यवतमाळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी नोंदविले बयान
रहागंडाले यांचे प्रकरण समाजसेवा अधीक्षकांनी यवतमाळ पोलिसांसमोर मांडले. यवतमाळचे पोलीस मंगळवारी नागपूर मेडिकलमध्ये पोहोचले. रहांगडाले यांचे बयान नोंदविले. रहांगडालेकडून पत्ता मिळाल्यामुळे पोलीस आता रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क साधणार आहेत. २२ फेबु्रवारीला नातेवाईक रहांगडाले यांना नेण्यासाठी येणार असल्याची सूत्राची माहिती आहे. समाजसेवा अधीक्षक नैतिक कर्तव्यासह माणुसकीचा परिचय नेहमीच देतात. या प्रकरणातही अधीक्षकांनी पुढाकार घेतल्यामुळे तब्बल अडीच महिन्यानंतर रहांगडाले यांची नातेवाईकांशी भेट होणार आहे.