नागपूर लता मंगेशकर रुग्णालयातील इन्टर्न संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:10 AM2018-06-29T00:10:34+5:302018-06-29T00:11:24+5:30
विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील (मेडिकल) प्रशिक्षणार्थी (इन्टर्न) डॉक्टर दोन आठवड्यापूर्वी संपावर गेले होते, आता डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर सोमवारपासून संपावर गेले आहेत. मेडिकलच्या इन्टर्न्सएवढेच विद्यावेतन देण्याची मागणी आहे. गेल्या चार दिवसांपासून संप सुरू असल्याने याचा फटका रुग्णसेवेवर बसल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील (मेडिकल) प्रशिक्षणार्थी (इन्टर्न) डॉक्टर दोन आठवड्यापूर्वी संपावर गेले होते, आता डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर सोमवारपासून संपावर गेले आहेत. मेडिकलच्या इन्टर्न्सएवढेच विद्यावेतन देण्याची मागणी आहे. गेल्या चार दिवसांपासून संप सुरू असल्याने याचा फटका रुग्णसेवेवर बसल्याचे बोलले जात आहे.
राज्यभरातील सर्व मेडिकल कॉलेजचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर १३ जूनपासून संपावर गेले होते. आठवडाभराच्या संपानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दोन महिन्यात विद्यावेतन वाढविण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत डिगडोह येथील एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स व लता मंगेशकर रुग्णालयातील ८० प्रशिक्षणार्थी डॉक्टर २५ जूनपासून संपावर गेले. येथील इन्टर्नना केवळ तीन हजार विद्यावेतन दरमाह दिले जाते. इतक्या कमी विद्यावेतनात खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न येथील डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन दोन महिन्यापूर्वी कॉलेज व्यवस्थापनेला निवेदन दिले होते. त्यानंतरही व्यवस्थापनाकडून दखलही घेण्यात आली नाही. यामुळे संतप्त प्रशिक्षणार्थी डॉक्टर अनिश्चितकालीन संपावर गेले. प्रशिक्षणार्थी डॉक्टर असले तरी रुग्णांचे रक्ताचे नमुने घेणे, सलाईन लावणे, रक्त चढविणे, रुग्णांच्या नोंदी ठेवणे आदी कामे करतात. परंतु आता हे डॉक्टरच नसल्याने थोड्या फार फरकाने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. विद्यावेतन वाढ होईपर्यंत संप सुरूच राहणार असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.