लाभले आम्हा.... नागपूरकरांनाही भाग्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 01:16 PM2022-02-07T13:16:17+5:302022-02-07T13:27:40+5:30

वक्ता दशसहस्त्रेशू राम शेवाळकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा लतादीदींच्या हस्ते १९ नोव्हेंबर २००५ रोजी नागपुरात धरमपेठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमासाठी पं. हृदयनाथ मंगेशकरांसोबत त्या आल्या होत्या.

lata mangeshkar's visit to nagpur | लाभले आम्हा.... नागपूरकरांनाही भाग्य!

लाभले आम्हा.... नागपूरकरांनाही भाग्य!

Next
ठळक मुद्देराम शेवाळकरांचा अमृत महोत्सव लतादीदींचा ‘मोगरा फुलला’ होता, पाच वेळा आल्या होत्या नागपूरकर रसिकांच्या भेटीला

प्रवीण खापरे 

नागपूर : लयीच्या प्रवाहात पहुडताना शब्दांना स्वप्न पडावे आणि त्याचे स्वर होऊन जावे, अशा लतादीदी. लतादीदींनी स्वरांच्या कंपनात श्रोत्यांच्या स्मृती जागृत केल्या, असा लाइव्ह प्रसंग नागपूरकरांना एकदाच अनुभवता आला.

लतादीदी नागपुरात पाच वेळा येऊन गेल्या. पहिल्यांदा तर गायनासाठीच आल्या होत्या. मात्र, गैरसमजामुळे नाराज होऊन त्या परतल्या होत्या. नागपूरकर गुणी रसिकांची राहून गेलेली ती फिर्याद राम शेवाळकरांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात पूर्ण झाली आणि लतादीदींच्या स्वरांचा मोगरा सर्वत्र दरवळला. त्याचा सुवास आजही जुन्या रसिकांच्या मनात आहे.

वक्ता दशसहस्त्रेशू राम शेवाळकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा लतादीदींच्या हस्ते १९ नोव्हेंबर २००५ रोजी नागपुरात धरमपेठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमासाठी पं. हृदयनाथ मंगेशकरांसोबत त्या आल्या होत्या. हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये थांबल्या होत्या. कार्यक्रमासाठी मनोहर म्हैसाळकरांसोबत लतादीदी, पं. हृदयनाथ, आशा भोसले व राधा मंगेशकर कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी लतादीदींनी राम शेवाळकरांचा आणि शेवाळकरांनी नागपूरकरांतर्फे लतादीदींचा सत्कार केला. यावेळी, लतादीदींनी १९४८ मधील त्या प्रसंगाविषयी खेद व्यक्त करीत, आपण नागपूरकरांवर नाराज नसल्याचे स्पष्ट केले.

लतादीदींचे हे स्पष्टीकरण ऐकताच नागपूरकरांनी राहून गेलेली ती फिर्याद पूर्ण करण्याचा आग्रह धरला. नागपूरकर रसिकांच्या त्या आग्रहाखातर तो आगळावेगळा कार्यक्रम रंगला. ज्ञानेश्वरीचे रसाळ निरूपण राम शेवाळकरांनी केले. पं. हृदयनाथांनी संवादिनी सांभाळली आणि लतादीदींनी संत ज्ञानदेवांची रचना ‘मोगरा फुलला’ सादर करीत, रसिकांच्या आत्म्याला सुखावले. या कार्यक्रमानंतर त्या दोन दिवस नागपुरातच थांबल्या होत्या. त्या घटनेच्या स्मृती विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर रंगवून सांगतात आणि तो प्रसंग साक्षात नजरेपुढे उभा होतो.

लतादीदी म्हणाल्या...माझ्या गाण्यापेक्षाही शेवाळकरांचे शब्द मोलाचे

शब्द संस्कारित असावा, त्यामागे कल्याणाची आणि फक्त कल्याणाचीच भावना असावी हे शेवाळकरांनी तुमच्या आमच्या आणि एकूणच मराठी मुलखाच्या गळी उतरविले आहे. मला माझ्या गाण्यापेक्षाही त्यांचे हे कार्य आणि त्यांचे शब्द मोलाचे वाटतात, असे विनम्र अन् भावपूर्ण उद्गार स्वरसप्राशी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी काढले होते.

प्रसंग होता वक्ता दशसहस्त्रेशू प्रा. राम शेवाळकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराचा. लतादीदी गायिल्या तर मला खूप आनंद होईल, अशी भावना ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत प्रा. राम शेवाळकर यांनी व्यक्त केली होती. या भावनेचा मान राखत लतादीदी यावेळी गायल्या. ‘मोगरा फुलला’ हे गाणे त्यांनी गायले आणि राम शेवाळकर यांच्यासह उपस्थित सगळ्यांच्याच मनाचा मोगरा फुलला होता. याप्रसंगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार आदी उपस्थित होते. यावेळी लतादीदींच्या हस्ते प्रा. राम शेवाळकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला होता.

नागपूरकरांनी हा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला आणि सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले गेले. विशेष म्हणजे, नागपुरात लतादीदी चार-पाच वेळा येऊन गेल्या होत्या. मात्र, त्या एकाही भेटीत गायल्या नव्हत्या. नागपूरकरांच्या स्वरांची भूक यावेळी लतादीदींनी प्रत्यक्ष पूर्ण केली होती.

चार वेळा केला नागपूरकरांनी सन्मान

लतादीदींचा नागपूरकरांनी तब्बल चार वेळा सन्मान केला. १९९४ साली माजी महापौर अटलबहाद्दूरसिंग यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. मनोहर म्हैसाळकरांच्या आग्रहाखातर त्यांनी हा सत्कार स्वीकारला होता. यावेळी, त्यांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम मुंबईहून आलेल्या चमूने सादर केला. मात्र, त्या गायल्या नव्हत्या. नंतर, १९९६ साली दीनानाथ प्रतिष्ठानचा कार्यक्रम पटवर्धन मैदानात पार पडला. यावेळी दीदींच्या हस्ते ज्येष्ठ समीक्षक द.भि. कुळकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आशा भोसले यांनी त्यांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम सादर केला. मात्र, येथेही त्या गायल्या नव्हत्या.

Web Title: lata mangeshkar's visit to nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.