नागपूर महापालिकेतील लेटलतिफ आता थेट घरीच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:34 PM2018-05-24T14:34:33+5:302018-05-24T14:34:47+5:30
महापालिके चे कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात. वेळेवर कार्यालयात येत नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी बुधवारी धरमपेठ व धंतोली झोनचा आकस्मिक पाहणी दौरा केला. यात उपअभियंत्यासह पाच कर्मचारी लेटलतिफ आल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिके चे कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात. वेळेवर कार्यालयात येत नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी बुधवारी धरमपेठ व धंतोली झोनचा आकस्मिक पाहणी दौरा केला. यात उपअभियंत्यासह पाच कर्मचारी लेटलतिफ आल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले.
निलंबितात धंतोली झोनमधील उपभियंता मनोज सिंग, धरमपेठ झोनमधील जलप्रदाय विभागातील एम.जी.भोयर फायलेरिया विभागातील ए.एस.शेख, लोककर्म विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी नितीन झाडे व अनिल निंबोरकर आदींचा समावेश आहे. झोन कार्यालयाची वेळ १० वाजताची आहे. कार्यालयीन वेळा पाळायलाच हव्या. १० वाजतानंतर जो कर्मचारी येईल, त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही आयुक्तांनी दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते.
सकाळी १० वाजता वीरेंद्र सिंग धंतोली कार्यालयात पोहचले. त्यांनी लगेच झोन कार्यालयाचे दरवाजे बंद केले. आतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हालचाल वही तपासली. विभागीय उपअभियंता एम.के.सिंग हे अनुपस्थित असल्याने आयुक्तांनी संताप व्यक्त करीत त्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. दरवाज्याच्या बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करून सर्वाचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कुठलीही पूर्वसूचना नसताना आयुक्त झोन कार्यालयात आल्याने कर्मचाऱ्यांचीही एकच तारांबळ उडाली. झोनमध्ये बायोमॅट्रिक सिस्टीम लागू करण्यात यावी. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती ही बायोमॅट्रिक पद्धतीने करण्यात यावी. सकाळी १० नंतर कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना यानंतर निलंबित करण्यात येईल, अशी तंबीही आयुक्तांनी यावेळी दिली. यावेळी झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, सहायक अधीक्षक श्रीकांत वैद्य उपस्थित होते.
त्यानंतर १०.१५ वाजता आयुक्त धरमपेठ झोन कार्यालयात पोहोचले. तेथेही त्यांना कर्मचाऱ्यांची लेटलतिफी निदर्शनास आली. यावर त्यांनी संताप व्यक्त केला. असे जर नेहमीच होत असेल तर हे योग्य नाही. यापूवीर्ही समज दिल्यानंतर असेच होत असेल तर आता गय करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. उशिरा येणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले.