हावडा-मुंबई मेलमध्ये अत्याधुनिक एलएचबी कोच : रेल्वे प्रशासनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 08:51 PM2019-12-13T20:51:11+5:302019-12-13T20:52:56+5:30
प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वेळोवेळी अतिरिक्त कोच जोडण्याची व्यवस्था तसेच कोचमध्ये बदल करण्यात येतो. रेल्वे प्रशासनाने १२८१०/१२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेलमध्ये अत्याधुनिक कोचची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रशासनाच्यावतीने रेल्वेगाड्यात विविध श्रेणीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वेळोवेळी अतिरिक्त कोच जोडण्याची व्यवस्था तसेच कोचमध्ये बदल करण्यात येतो. रेल्वे प्रशासनाने १२८१०/१२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेलमध्ये अत्याधुनिक कोचची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
एलएचबी कोच हे प्रवाशांसाठी सुविधाजनक असल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या वतीने टप्प्याटप्प्याने सर्वच रेल्वेगाड्यात एलएचबी कोच लावण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक १२८१०/१२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेलमध्ये हावडावरून १० डिसेंबरपासून तर मुंबईवरून १२ डिसेंबरपासून एलएचबी कोच लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने एलएचबी कोच लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर या गाडीत आता एकूण २२ कोच झाले आहेत. यात २ एसी टु टायर, ४ एसी थ्री टायर, ११ स्लिपर, १ सामान्य, १ पेंट्रीकार आणि २ जनरेटरचा समावेश आहे. प्रवाशांनी एलएचबी कोचचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
काय आहे एलएचबी कोच ?
एलएचबी म्हणजे लिंक हॉफमन बुश ही जर्मनीची कंपनी होय. या कंपनीने एलएचबी कोच विकसित केले आहेत. हे कोच प्रवासाच्या दृष्टीने अतिशय आरामदायी आहेत. या कोचमधून प्रवास करताना प्रवाशांना झटके लागत नाहीत. जुन्या कोचमध्ये ७२ कोच असायचे. परंतु एलएचबी कोचमध्ये बर्थची संख्या वाढून ८४ झाली आहे. जुने कोच लोखंडी असल्यामुळे त्याचे वजन अधिक होते. परंतु एलएचबी कोच स्टेनलेस स्टीलचे असल्यामुळे या कोचचे वजन जास्त राहत नाही. अपघात झाल्यास हे कोच एकमेकांवर चढत नाहीत किंवा दुसऱ्या कोचमध्ये घुसत नाहीत. त्यामुळे जीवितहानीची शक्यता उरत नाही. एलएचबी कोचच्या खिडक्यांना मॉडर्न लुक देण्यात आला आहे. या कोचमध्ये मॉडर्न टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जुन्या कोचची नॉर्मल स्पीड ११० किलोमीटर प्रती तास होती. एलएचबी कोचची स्पीड १३० असल्यामुळे प्रवासाला अधिक वेळ लागत नाही.