उपराजधानीतील ‘डबलडेकर ब्रिज’ जुलैमध्ये सुरू होणेही अनिश्चित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:00 PM2020-06-30T12:00:53+5:302020-06-30T12:03:00+5:30
उपराजधानीतील सव्वातीन किलोमीटर लांबीच्या या डबलडेकर ब्रिजच्या निर्माण कार्यास एप्रिल २०१७ मध्ये सुरुवात झाली होती. मात्र, तीन वर्षे होऊनही निर्माण कार्य पूर्ण झालेले नाही.
आनंद शर्मा / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जयपूरनंतर नागपुरातील वर्धा महामार्गावर निर्माणाधीन असलेल्या रिब अॅण्ड स्पाईन टेक्नॉलॉजीवर आधारित मेट्रोचा डबलडेकर ब्रिज जुलैमध्ये नागरिकांसाठी मोकळा होण्याची शक्यता होती. मात्र, आता ते शक्य दिसत नाही. या ब्रिजचे निर्माणकार्य याचवर्षी मार्च महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. आता टाळेबंदीमुळे निर्माण कार्य रखडल्याचे कारण पुढे केले जात असून, हा ब्रिज नागरिकांसाठी कधी उघडेल हे सांगण्यास महामेट्रो प्रशासन असमर्थ दिसत आहे.
डबलडेकर ब्रिजचे ९८ टक्के सिव्हिल वर्क पूर्ण झाल्याचा दावा महामेट्रोच्या अधिकारिक सूत्रांकडून कळते आहे. केवळ इलेक्ट्रिक पोल, लाईट, पॅनल, सायनेज, ड्रेनेजचे काम शिल्लक राहिले आहे. ब्रिजच्या खाली पेटिंगचही काही काम राहिले आहे. इलेक्ट्रिक आणि सायनेज वर्कसाठीचे साहित्य पुणे येथून येणे आहे. टाळेबंदीमुळे हे साहित्य वेळेत नागपुरात पोहोचू शकले नाही. आता टाळेबंदी शिथिल झाल्याने ते मागवले जात आहे. हे साहित्य आल्यावर फिटिंगचे काम होईल. रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय वाहतुकीकरिता ब्रिज मोकळा करणे शक्य नाही. या कामासाठी एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, जुलै महिन्यात हा ब्रिज वाहतुकीकरिता मुक्त होण्याची शक्यता कमीच आहे.
तीन वर्षे झाली तरी काम अपूर्ण
सव्वातीन किलोमीटर लांबीच्या या डबलडेकर ब्रिजच्या निर्माण कार्यास एप्रिल २०१७मध्ये सुरुवात झाली होती. मात्र, तीन वर्षे होऊनही निर्माण कार्य पूर्ण झालेले नाही. वर्धा महामार्गावरील हॉटेल प्राईड ते अजनी चौकापर्यंत हा ब्रिज आहे. या मार्गावर मेट्रोचे उज्ज्वलनगर, जयप्रकाशनगर व छत्रपतीनगर अशी तीन स्टेशन येतात. जवळपास ३६५ कोटी रुपये खर्चात बनत असलेल्या या ब्रिजचे काम नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे.
मेट्रो डबलडेकर ब्रिजवरील इलेक्ट्रिकल व अन्य काही काम शिल्लक राहिले आहे. हे काम पूर्ण झाल्यावरच डबलडेकर ब्रिज नागरिकांच्या वाहतुकीकरिता खुला करण्याचा निर्णय घेतला जाईल.
- अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक (कॉपोर्रेट कम्युनिकेशन), महामेट्रो