महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:10 AM2021-03-10T04:10:22+5:302021-03-10T04:10:22+5:30
भिवापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानास तालुक्यात प्रारंभ झाला आहे. शिवाय ...
भिवापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानास तालुक्यात प्रारंभ झाला आहे. शिवाय जागतिक पर्यावरण दिनसुद्धा साजरा करण्यात येत आहे. ८ मार्च ते ५ जूनपर्यंत हे अभियान चालणार आहे. अभियानाचे उद्घाटन सभापती ममता शेंडे यांनी केले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी रोशनकुमार दुबे, उपसभापती कृष्णा घोडेस्वार, राहुल मेश्राम, विस्तार अधिकारी प्रभाकर वाघ, बँक ऑफ इंडिया भिवापूर शाखेचे व्यवस्थापक गुणवंत कोसारे, लुपिनचे समन्वयक शिल्पा गुरडकर आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला संबोधित करताना सहायक गटविकास अधिकारी रोशनकुमार दुबे यांनी विविध विभागांतर्गत येणाऱ्या योजना सांगत महिला सक्षमीकरणाबाबत माहिती दिली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक नियमावलीचे पालन करून हे अभियान राबविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. अभियानाचे तालुका व्यवस्थापक रवींद्र शेंडे यांनी प्रास्ताविकात महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाची पार्श्वभूमी विशद केली. यावेळी उपस्थित महिला कॅडरनी कृषी, बँक व्यवहार, आर्थिक साक्षरता, संस्था व क्षमता बांधणीसह प्रगतीकडे वाटचाल यावर मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार आरती तिमांडे यांनी केले. यावेळी सीआरपी, उपजीविका सखी, कृषी सखी, पशू सखी, बँक सखी, आर्थिक साक्षरता सखी व महिला समूह सदस्य, ग्रामसंघ पदाधिकारी आदी उपस्थित होते.
नानाविध उपक्रम
अभियानांतर्गत तालुक्यात विविध उपक्रम राबविल्या जात आहे. यात आतापर्यंत बँक ऑफ इंडिया व भारतीय स्टेट बँकेच्या भिवापूर शाखेमार्फत चार महिला बचत गटांना सहा लाख रुपयाचे कर्ज वितरण करण्यात आले. बीओएम नांदमार्फत महिला सदस्य वैशाली गेडाम यांना ४१ हजार रुपये मुद्रा लोन देण्यात आले. यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार, नक्षी येथे रमाबाई महिला समूहाचे कापड व्यवसायाचे उद्घाटन, कारगाव येथे कृतिसंगममधून घरकुल गृहप्रवेश व नवीन घरकुल भूमिपूजनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहायक गटविकास अधिकारी रोशनकुमार दुबे, कारगावच्या सरपंच माधुरी दडवे, रवींद्र शेंडे, हरीश धार्मिक व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.