नागपुरात चिनी वस्तूंच्या बहिष्काराच्या राष्ट्रीय अभियानाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:49 PM2020-06-10T23:49:25+5:302020-06-10T23:50:47+5:30
चीनचे भारतविरोधी धोरण पाहता देशातील ७.५० कोटी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारपासून ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या नावाने एक राष्ट्रीय अभियान संपूर्ण देशात सुरू केले आहे. या अंतर्गत स्वदेशीचा संदेश देणारे फेस मास्क आणि रेल्वेत चहा ग्लासचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चीनचे भारतविरोधी धोरण पाहता देशातील ७.५० कोटी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारपासून ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या नावाने एक राष्ट्रीय अभियान संपूर्ण देशात सुरू केले आहे. या अंतर्गत स्वदेशीचा संदेश देणारे फेस मास्क आणि रेल्वेत चहा ग्लासचे वाटप करण्यात आले.
डिसेंबर २०२१ पर्यंत चीनमध्ये निर्मित वस्तूंची भारतात आयात १ लाख कोटींनी कमी करण्याचे ‘कॅट’चे लक्ष्य आहे. ‘कॅट’चे अभियान पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनाला यशस्वी करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतात पूर्वीपासून उत्पादन होणाऱ्या ३ हजार वस्तूंची यादी कॅटने तयार केली असून या वस्तूंची आयात चीनमधून कशी थांबेल, यावर जनजागृती करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत देशातील व्यापारी आणि लोकांना जागरूक करून भारतीय उत्पादनांची खरेदी-विक्री करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले. चीनमधून भारतात चार प्रकारच्या वस्तू आयात होतात. त्यामध्ये तयार माल, कच्चा माल, स्पेअर पार्ट आणि तांत्रिकी उत्पादने आहेत. या वस्तूंची विक्री कमी कशी होईल, यावर भर राहणार आहे. देशातील व्यापारी स्वदेशीचा संदेश देणारे मास्क घालून अभियानाचा प्रसार करणार आहेत तर दुसरीकडे डिसेंबरपर्यंत सर्व राजधानी आणि शताब्दी रेल्वेत जवळपास ५ कोटी ग्लास कॅटरिंगमध्ये वितरित करण्यात येणार आहे. या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात कॅटचा संदेश पोहोचविण्यात येणार आहे. यामध्ये देशातील विविध संघटना आणि संस्थांना जोडण्यात येणार आहे.
कॅट गेल्या चार वर्षांपासून चिनी उत्पादनांच्या बहिष्कारासाठी वेळोवेळी आंदोलन करीत आहे. त्याच कारणाने आणि सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमामुळे वर्ष २०१८ ते आतापर्यंत चीनच्या आयातीत ६ अब्ज डॉलरची घट झाली आहे. चिनी वस्तूंच्या बहिष्कारावर भारतीय नेहमीच शंका उपस्थित करतात, पण भारतीय लोकांसोबतच हा संकल्प तडीस नेण्याचा कॅटचा प्रयत्न असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.